ब्रिटन-भारतात आजपासून मैत्रीचे नवीन पर्व; पंतप्रधान स्टार्मर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत भेट
Keir Starmer-Narendra Modi : आजपासून ब्रिटन आणि भारताच्या नवीन मैत्री पर्वाची ऐतिहासिक सुरुवात होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला खास प्रत्युत्तर देण्यासाठी आजची नरेंद्र मोदी आणि किअर स्टार्मर यांची होणारी भेट महत्त्वाची मानण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटेनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर आज मुंबईत होणाऱ्या सहाव्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 मध्येही सहभागी होतील आणि या प्रसंगी प्रमुख भाषणही देतील. हा आंतरराष्ट्रीय फेस्ट जगभरातील नवप्रवर्तक, धोरणनियंते, केंद्रीय बँकर, नियामक, गुंतवणूकदार, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांना एकत्र आणणारा ठरणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला खास प्रत्युत्तर देण्यासाठी आजची नरेंद्र मोदी आणि किअर स्टार्मर यांची होणारी भेट महत्त्वाची मानण्यात येत आहे. या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये मोदी घेणार सहभाग, पोलिसांचा बीकेसीत तगडा बंदोबस्त दिसून येत आहे. ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किअर स्टार्मर यांच्या स्वागताचे लागलेले बॅनर्स लक्ष वेधून घेत आहेत.
ब्रिटन-भारतात द्विपक्षीय चर्चा
‘एक उत्तम जगासाठी आर्थिक सशक्तीकरण’, या परिषदेचा प्रमुख विषय आहे ,ज्यात तंत्रज्ञान आणि मानवी अंतर्दृष्टी यांच्या संगमातून नैतिक आणि शाश्वत आर्थिक भविष्य कसे घडवता येईल यावर भर देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ब्रिटिश समकक्ष कीअर स्टार्मर आज द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर बुधवारी दोन दिवसीय भारत दौर्यावर मुंबईत दाखल झाले. त्यांच्या सोबत ब्रिटनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापारी प्रतिनिधीमंडळ आले आहे.
भारत-ब्रिटन व्यापक रणनीतिक भागीदारीवर चर्चा या भेटीदरम्यान दोन्ही देशांचे पंतप्रधान ‘व्हिजन 2035’च्या अनुषंगाने भारत-ब्रिटन व्यापक रणनीतिक भागीदारीच्या विविध पैलूंवर प्रगतीचा आढावा घेतील. व्हिजन 2035’ हा व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवकल्पना, संरक्षण आणि सुरक्षा, हवामान आणि ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आणि लोकांमधील संबंध अशा प्रमुख क्षेत्रांवर केंद्रित असा दहा वर्षांचा रोडमॅप आहे. सीईटीए कराराद्वारे नव्या आर्थिक संधींवर चर्चा होणार आहे. दोन्ही पंतप्रधान उद्योगतज्ज्ञ, धोरणनियंत्य आणि नवप्रवर्तकांशी संवाद साधणार आहेत.
राजभवनात होईल भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची राजभवनात भेट हॊईल. दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये एक संयुक्त बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ‘व्हिजन २०३५’ ह्या पुढील १० वर्षांच्या वाटचालीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये बैठक हॊईल. भारत–यूके सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यावर चर्चा होणार आहे. मोदी आणि स्टार्मर या दोन्ही नेत्यांमधील ही तिसरी भेट आहे. पहिल्या दोन भेटी ह्या जुलै महिन्यात चेकर्स आणि जी२० परिषद रियोमध्ये पार पडली होती येथे झाल्या होत्या.
मोदी यांच्यासोबत बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि सचिव विक्रम मिस्री असतील. ब्रिटनकडून स्टार्मरसोबत व्यवसाय व व्यापार मंत्री पीटर काइल आणि गुंतवणूक मंत्री जेसन स्टॉकवुड असतील. दोन्ही नेत्यांच्या बैठकीतील चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, हवामान बदल, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असेल. दोन्ही नेत्यांमधील चर्चेत भारत–ब्रिटन व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीत नव्या पातळीवर वाढ अपेक्षित आहे. जुलैमध्ये भारत आणि ब्रिटनमध्ये फ्री ट्रेड करार झाला आहे. करारामुळे जवळपास ९९ टक्के भारतीय निर्यातीला यूकेमध्ये शुल्क-मुक्त प्रवेश मिळणार आहे. सोबतच, ब्रिटनला देखील युरोपीय युनियनमधून बाहेर पडल्यानंतर आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळाला आहे.
