आता मुंबईत कुणीही उपाशी राहणार नाही, दररोज 25 हजार गरिबांना मोफत अन्न; ‘अक्षय चैतन्य’चे भायखळ्यात महास्वयंपाकघर!

भीमराव गवळी, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 28, 2022 | 6:48 PM

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असले तरी याच शहरात हजारो लोकांना भुकेलं झोपावं लागतं. नेमकी हीच गंभीर बाब ध्यानात घेऊन ‘अक्षय चैतन्य’ या सेवाभावी संस्थेनं भायखळ्यात महास्वयंपाकघर उभारले आहे.

आता मुंबईत कुणीही उपाशी राहणार नाही, दररोज 25 हजार गरिबांना मोफत अन्न; 'अक्षय चैतन्य'चे भायखळ्यात महास्वयंपाकघर!
Centralised Kitchens
Image Credit source: akshaya chaitanya website

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (mumbai) सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असले तरी याच शहरात हजारो लोकांना भुकेलं झोपावं लागतं. नेमकी हीच गंभीर बाब ध्यानात घेऊन ‘अक्षय चैतन्य’ (akshay chaitanya) या सेवाभावी संस्थेनं भायखळ्यात महास्वयंपाकघर उभारले आहे. या महास्वयंपाक घरात दररोज तब्बल 25 हजार गरजू लोकांसाठी मोफत जेवण बनवले जाणार आहे. त्यामुळे या मायानगरीत आता कुणीही उपाशी झोपणार नाही. कोणत्याही दिवशी तब्बल 25 हजार लोकांना जेवण देऊ शकेल अशा क्षमतेच्या या संस्थेच्या केंद्रीय स्वयंपाकघराचे (सेंट्रलाइज्ड किचन) उद्घाटन राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. येत्या 4 मार्च रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना उपाशी रहावं लागू नये, यासाठी मुंबईतील ‘अक्षय चैतन्य’ ही सेवाभावी संस्था कौतुकास्पद कार्य करत आहे. संस्थेच्या केंद्रापासून 10 मैल त्रिज्येच्या परिसरात कुणीही उपाशी राहणार नाही, ही या संस्थेची शपथ प्रत्यक्षात उतरत आहे. कोणत्याही दिवशी तब्बल 25 हजार लोकांना जेवण देऊ शकेल अशा क्षमतेच्या या संस्थेच्या केंद्रीय स्वयंपाकघराचे (सेंट्रलाइज्ड किचन) उद्घाटन राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 4 मार्च रोजी होणार आहे. भायखळा येथील या महास्वयंपाकघराच्या उदघाटन सोहळ्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव आणि मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त सुरेश ककाणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हरे कृष्ण मूव्हमेंट चॅरिटेबल फाऊंडेशन’चा उपक्रम असलेल्या ‘अक्षय चैतन्य’ने मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डीएमईआर) यांच्यासोबत समन्वय साधून भूकमुक्तीसाठीच्या अन्नदानाचा हा उपक्रम राबवला जाणार आहे.

शाळेतही जेवण देणार

“रुग्णालयांतील केवळ रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठीच नव्हे, तर स्थलांतरीत मजूर, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे गोरगरीब आणि बालके यांचीही भूक मिटवण्यासाठी अक्षय चैतन्य त्यांना जेवण देणार आहे. अत्यंत गरीब घरच्या बालकांसाठी आम्ही शाळांमध्येही जेवण उपलब्ध (मील प्रोग्राम) करुन देणार आहोत”, अशी माहिती ‘अक्षय चैतन्य’चे सीईओ विकास परछंदा यांनी दिली.

50 हजार लोकांना जेवण पुरवण्याची क्षमता

हैदराबादमध्ये अशाच प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवून संस्थेने हैदराबादला भूकमुक्त केले आहे. संस्थेच्या हैदराबादमधील केंद्रीय कम्युनिटी किचनची क्षमता दररोज 50 हजार लोकांना जेवण पुरवण्याइतकी आहे. संस्थेमार्फत ‘स्वस्थ आहार’ हा कार्यक्रमही राबवण्यात येतो, ज्या अंतर्गत हैदराबादमधील 400 सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दररोज बाजरी आदी भरड धान्याचा नाश्ता पुरवला जातो. याच धर्तीवर आता मुंबईतील गोरगरीब- गरजू कुटुंबांतील व्यक्तींना, रुग्णांच्या नातेवाईकांना तसंच बालकांना पोषक जेवण मोफत उपलब्ध करुन देण्याचा ‘अक्षय चैतन्य’चा निर्धार आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य, अखेर खासदार संभाजी छत्रपतींकडून उपोषण मागे

आता राज्यात वीज निर्मिती केंद्र तिथे जैवविविधता उद्याने, ऊर्जा मंत्र्याची मोठी घोषणा

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण, काय म्हणाले कोश्यारी?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI