“ग्रामपंचायतीला दोन गट उभे राहतात; निवडून येतो, तो म्हणतो दादा आम्ही तुमचे” अजितदादांनी हशा पिकवला

महाविकास आघाडीला कोणताही अडथळा न येता स्थानिक स्वराज्य संस्थेत यश मिळावं हाच प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar on Gram Panchayat Election)

"ग्रामपंचायतीला दोन गट उभे राहतात; निवडून येतो, तो म्हणतो दादा आम्ही तुमचे" अजितदादांनी हशा पिकवला
Ajit Pawar


मुंबई : “ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही पक्ष महत्त्वाचा नसतो. निवडणूक चिन्हं नसतं, एबी फॉर्म नसतो. दोन गट उभे राहतात, जो निवडून येतो तो म्हणतो, दादा आम्ही तुमचे, आम्ही पण शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतो” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खसखस पिकवली. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे 12 नेते लक्ष घालणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बोलत होते. कांजूर मेट्रो कारशेड, औरंगाबाद नामांतर अशा अनेक विषयांवर ते माध्यमांशी बोलत होते. (Ajit Pawar on Gram Panchayat Election)

“भाजपचे बारा नेते मैदानात उतरणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यामुळे काही तरी काम करतोय, हे दाखवायचं आहे. त्यांच्या पक्षाने काय करावं, हा सर्वस्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांचा प्रश्न आहे. मी त्यावर भाष्य करणार नाही. पण ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही पक्ष महत्त्वाचा नसतो. निवडणूक चिन्हं नसतं, एबी फॉर्म नसतो. सरपंच म्हणतात आम्ही तुमच्या पक्षाचे आणि काम करुन घेतात. मी तीस वर्ष या निवडणुका पाहतोय. दोन गट उभे राहतात. जो निवडून येतो तो म्हणतो, दादा आम्ही तुमचे. आम्ही पण म्हणतो, या बसा. शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतो” असं अजित पवार म्हणताच एकच हशा पिकला.

“त्याबद्दल निवडणूक आयोग बोलेल…”

“तुम्हाला पक्षाचं काम पाहायचं असेल, तर जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगर पालिका, महापालिका अशा निवडणुका पाहा. साखर कारखान्यांच्या निवडणुकीतही पॅनल असतात. मी बातम्या वाचल्या की बिनविरोध निवडणूक झाल्यास इतकी रक्कम देणार. त्याबद्दल निवडणूक आयोगाला बोलण्याचा अधिकार आहे.” असं अजित पवार सांगत होते.

आघाडीची आमची मानसिकता : अजित पवार

मुंबई महापालिका निवडणुकीत मित्र पक्षांसोबत आघाडी करुन पुढे जाण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. शेवटी अंतिम निर्णय शरद पवार घेतील. आघाडी व्हावी, ही आमची मानसिकता आहे. मतांची विभागणी होऊ नये. नाही तर तुला ना मला, दे तिसऱ्याला असं होऊ नये. आघाडीबाबत मी सकारात्मक आहे, असं त्यांनी सांगितलं. आघाडीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याशी चर्चा करू. महाविकास आघाडीला कोणताही अडथळा न येता स्थानिक स्वराज्य संस्थेत यश मिळावं हाच आमचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

नामांतराबाबत चर्चेतून मार्ग काढू; ‘त्या’ ट्विटची शहानिशा करू: अजित पवार

(Ajit Pawar on Gram Panchayat Election)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI