निवडणुकांमुळे अशा दारुपार्ट्यांना परवानगी का? वांद्रे किल्ल्याच्या व्हिडीओवरून अखिल चित्रेंचा संताप
वांद्रे किल्ल्यावर झालेल्या दारुपार्टीवरून अखिल चित्रेंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिका निवडणूक येत असल्याने अशा पार्ट्यांना परवानगी दिली जातेय का, असा सवाल त्यांनी भाजपच्या आशिष शेलार यांना केला आहे.

मुंबईतील वांद्रे किल्ल्यावरील दारुपार्टीचा एक व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करत तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी वांद्रे किल्ल्याची पाहणी केली. “या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. उद्या मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र लिहून कारवाईची मागणी करेन”, असं ते म्हणाले. चित्रे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये वांद्रे किल्ल्यावर जंगी दारूपार्टी होत असल्याचं पहायला मिळतंय. त्यावरून नेटकऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. ऐतिहासिक वास्तूवर दारुपार्टीची परवानगी दिलीच कशी, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.
“मी फक्त आरोप केले नाहीत, तर पुरावेसुद्धा दिले आहेत. इथले स्थानिक रहिवासी जेव्हा तिथे पाहणीसाठी गेले होते, तेव्हा त्यांना तिथे दारुविक्री होत असल्याचं पहायला मिळालं. ही एक हेरिटेज साइट आहे आणि ही जागा मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. इथे दारुची परवानगी देता येते का? राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही परवानगी दिलीच कशी? वांद्रे किल्ल्याचं सुशोभीकरण आशिष शेलार यांनीच केलेलं आहे आणि त्यांच्याच विधानसभेत असे कार्यक्रम होत आहेत. आतापर्यंत आयोजकांवर कारवाई का झाली नाही”, असा सवाल चित्रे यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि @mybmc @mybmcWardHW… pic.twitter.com/pV1Urn0C6b
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) November 16, 2025
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली. सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी होत असतील तर कारवाई होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यावरूनही अखिल चित्रे यांनी निशाणा साधला आहे. “महानगरपालिकेच्या निवडणुका समोर येत आहेत म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आयोजित करण्यात येतात का? इथे सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतात पण दारू पार्टी होऊ शकत नाही. ज्याने व्हिडिओ काढले त्यांच्यावरच कारवाई करण्याची धमकी पोलीस देत होते. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यावर कारवाई करणार का किंवा कारवाईची मागणी करणार आहेत का? आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत. सांस्कृतिक मंत्र्यांना पण आम्ही पत्र लिहिणार आहेत,” असं ते पुढे म्हणाले.
पोर्तुगीजांनी बांधलेल्या आणि नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिका परवानगी देतंच कसं? आणि किल्ल्यावरील या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग? नक्की काय सुरु आहे, असा प्रश्न अखिल चित्रे यांनी व्हिडीओ पोस्ट करत केला होता.
