पॉर्न अॅप, वेबसाईट, ओटीटीची टास्क फोर्सकडून झाडाझडती करा, आशिष शेलारांचं अमित शाहांना पत्र

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर आशिष शेलार यांनी अमित शाह यांना पत्र लिहून या प्रकरणी संयुक्त टास्क फोर्स नियुक्त करुन अधिक झाडाझडती करण्याची मागणी केलीय.

पॉर्न अॅप, वेबसाईट, ओटीटीची टास्क फोर्सकडून झाडाझडती करा, आशिष शेलारांचं अमित शाहांना पत्र


मुंबई : “नुकत्याच अटक झालेल्या राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणानंतर मुंबई पोलिसांच्या तपासात अश्लील साईट आणि उद्योगातील गुन्हेगारांकडून तरुणांचे शोषण आणि प्रचंड आर्थिक फसवणूकीची अनेक धक्कादायक माहिती उघड होत आहे. त्यामुळे या प्रकरणी संयुक्त टास्क फोर्स नियुक्त करुन अधिक झाडाझडती करण्यात यावी,” अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केलीय. याबाबत त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून ही मागणी केली.

केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आशिष शेलार म्हणाले, “राज कुंद्रा कंपनीतर्फे चालवले जाणारे 1 अश्लील अ‍ॅप सबस्क्राईब रेव्हेन्यू म्हणून दरमहा 20 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमवत आहे, असा आरोप करण्यात येतो आहे. होतकरू तरुण तरुणींचे शोषण करून दबाव आणून हे व्हिडीओ तयार केली गेली होती. अशा 40 हून अधिक बेकायदेशीर अश्लील अॅप्स आणि वेबसाईट्स सदस्यत्वातून शेकडो कोटींची कमाई करतात. या सगळ्यातून तरुण पिढीवर, किशोरवयीन मुलांवर विपरीत परिणाम होत आहेत. तसेच ते नकारात्मकतेने घेरले आहे.”

“महाराष्ट्रात 2019 पासून 15,000 पेक्षा जास्त बाल अश्लील क्लिप अपलोड”

“चाईल्ड पॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत 2019 पासून 15,000 पेक्षा जास्त बाल अश्लील क्लिप अपलोड केल्या गेल्या. 213 एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. सन 2017 पासून 2019 पर्यंत पॉस्को प्रकरणात 45 टक्के वाढ झाली आहे. ही अत्यंत बाब चिंताजनक आहे,” असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

“संयुक्त टास्कफोर्स करुन सर्व अश्लील प्लॅटफॉर्मची झाडाझडती घ्यावी”

आशिष शेलार म्हणाले, “मोठ्या फिल्म प्रोडक्शन कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थोड्या प्रमाणात कुठल्याही नियंत्रणाशिवाय तथाकथित प्रौढ किंवा अश्लील चित्रपट सामग्री तयार करतात. यात Balaji Telefilms, VOOT, MX Player, Ullu, Kooku, DesiFlix, Hot Shots, Primeflix, GupChup, Flizmov हे प्लॅटफॉर्म आघाडीवर आहेत. म्हणून सीबीआय, ईडी, आय अँड बी, आयटी मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि एमसीएची एक संयुक्त टास्कफोर्स तयार करुन अशा सर्व अश्लील ओटीटी अॅप्स आणि वेबसाईट्सची झाडाझडती घेण्यात यावी. तसेच पॉर्न वेबसाईट्स ब्लॉक करण्यासाठी आणि अशी सर्व अॅप्ससाठी कठोर नियमावली आयटी मंत्रालयाला विकसित करण्याचे निर्देश देण्यात यावेत.”

“तक्रारी नोंदवण्यासाठी केंद्रीय पातळीवर पॉर्न आणि चाईल्ड पॉर्न हेल्पलाईन सुरु करावी”

“नागरिकांना अशी सर्व प्रकरणांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी केंद्रीय पातळीवर पॉर्न आणि चाईल्ड पॉर्न हेल्पलाईन सुरु करण्यात यावी. त्याबाबत माहिती वेळोवेळी सोशल मीडिया हँडल देण्यात यावे. तसेच सर्व ओटीटी वरील फिल्म, वेबसिरीज सेन्सॉर बोर्डाच्या नियमात आणण्याबाबत विचार करण्यात यावा. गंभीर बाब म्हणजे ड्रग्ज माफिया आणि या अश्लीलतेचा व्यापार करणाऱ्या माफियांचे साटेलोटे असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे त्याचाही कसून तपास करण्यात यावा,” अशा मागण्या आमदार आशिष शेलार यांनी केल्या आहेत.

हेही वाचा :

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी आणखी 40 स्पेशल गाड्या सोडणार; रावसाहेब दानवे यांची घोषणा

निलंबनाच्या कारवाईविरोधात भाजपच्या 12 आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव, 12 आमदारांच्या 4 याचिका!

राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोमात, राज्यात सध्या असे दुर्दैवी चित्र : आशिष शेलार

व्हिडीओ पाहा :

Ashish Shelar write letter to Amit Shah after Raj Kundra controversy

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI