या फोटोची चर्चा मुंबईत का आहे? मुख्यमंत्र्यांकडून मान की..वाचा सविस्तर प्रकरण

वर्षभरापूर्वी मेट्रो प्रकरणात उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या फोटोची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. | CM Uddhav Thackeray ambitious coastal road project

या फोटोची चर्चा मुंबईत का आहे? मुख्यमंत्र्यांकडून मान की..वाचा सविस्तर प्रकरण

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला सोमवारपासून प्रारंभ झाला. कोस्टल रोड (Costal road project) प्रकल्पासाठी दोन महाबोगदे तयार करण्यात येणार आहेत. या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या ‘मावळा’ या अजस्त्र बोरिंग मशिनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला कोस्टल रोड प्रकल्पात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सरकारी अधिकारी उपस्थित होते. तेव्हाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (CM Uddhav Thackeray  and Ashwini Bhide photo in costal road project event viral on social Media)

या फोटोत मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांच्या हस्ते कार्यक्रमाचा नारळ वाढवण्यात आल्याचे दिसत आहे. त्यांच्या अगदी बाजूलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे उभे आहेत. वर्षभरापूर्वी मेट्रो प्रकरणात उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या फोटोची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. अश्विनी भिडे यांनी मेट्रोच्या संचालकपदी असताना आरे कारशेडचे समर्थन केले होते. त्यामुळे ठाकरे सरकारच्या काळात अश्विनी भिडे यांना मेट्रोच्या संचालकपदावरून दूर करण्यात आले होते.

अश्विनी भिडे यांच्यासाठी हा एकप्रकारचा अपमान होता. मात्र, त्याच अश्विनी भिडे यांच्याकडून शिवसेनेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा नारळ वाढवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आजच्या प्रसंगाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अश्विनी भिडे यांचा विशेष उल्लेख केला.

नेमकं काय घडलं होतं?

फडणवीस सरकारच्या काळात अश्विनी भिडे या मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. तेव्हा मेट्रो-3 प्रकल्पाच्या आरेमधील कारशेडवरून प्रचंड वाद झाला होता. या कारशेडमुळे आरेतील जंगलाची हानी होत असल्याच्या पर्यावरणवाद्यांच्या आक्षेपामुळे राजकीय वाद पेटला होता.

मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरेत मेट्रोची कारशेड उभारण्यावर ठाम होते. त्यावेळी अश्विनी भिडेही वेगवेगळ्या व्यासपीठांवरून मेट्रोत आरेची कारशेड उभारणे कशाप्रकारे व्यवहार्य आहे, हे ठामपणे सांगत होत्या. मात्र, मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील झाडांची कत्तल झाल्यानंतर हा वाद प्रचंड पेटला होता. त्यावेळी शिवसेनेने सत्तेत असूनही आरे कारशेडच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतरही देवेंद्र फडणवीस आणि अश्विनी भिडे या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या होत्या.

ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांची मेट्रो-3 च्या संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.

पालिकेचे अधिकारी-कर्मचारीही मावळेच: मुख्यमंत्री

महाबोगदा तयार करण्याचं काम मुंबई महापालिकेने हाती घेतलं आहे. एवढं मोठं काम हाती घेणारी मुंबई महापालिका एकमेव पालिका आहे. हे बोगदे खोदण्यासाठी मावळा आणला आहे. जगातील सर्वात मोठी मशीन आहे ही. या मशीनद्वारे दोन बोगदे खोदले जातील. ऑगस्टपर्यंत एका बोगद्याचं काम पूर्ण होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

कोरोना काळातही कोस्टलरोडचं काम सुरू होतं. ठरलेल्या वेळेतच काम पूर्ण होईल. पालिका पदाधिकारी-कर्मचारी हे काम करत आहेत. हे सर्व मावळेच आहेत, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडला सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल, केवळ रस्ताच बांधण्याची अट

खास ‘मावळा’ समुद्राखाली 400 मीटरचे बोगदे खोदणार, मुंबईच्या समुद्रात काम नेमकं कसं चालणार?

आरे कारशेड प्रकरण भोवलं, अश्विनी भिडेंची मेट्रो 3 प्रकल्पावरुन उचलबांगडी

(CM Uddhav Thackeray  and Ashwini Bhide photo in costal road project event viral on social Media)

Published On - 7:34 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI