मुंबईकरांसाठी मोफत रक्त तपासणी, बीएमसीची घोषणा

  • Sachin Patil
  • Published On - 15:27 PM, 7 Nov 2018
मुंबईकरांसाठी मोफत रक्त तपासणी, बीएमसीची घोषणा

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबई महापालिकेने मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला महापालिकेतर्फे 139 प्रकारच्या रक्त चाचण्या मुंबईकरांसाठी मोफत उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामध्ये विशेष प्रकारच्या 38 चाचण्या असतील. ही सेवा महापालिकेच्या सर्व रुग्णालयात आणि उपनगरातील भाभा, राजावाडी आणि शताब्दी येथे उपलब्ध असेल.

‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलं आहे. खासगी लॅबच्या मनमानीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारीपासून ही सेवा सर्व पालिकेच्या रुगण्लायात सुरु होईल. या निर्णयामुळे लवकरच खासगी लॅबच्या मनमानीतून रुग्णांची सुटका होण्यास मदत होईल. येत्या 15 दिवसांत टेंडर स्थायी समितीमध्ये मांडण्यात येईल. तसेच ‘आपली चिकित्सा’ नावाचा प्रकल्प गेले चार वर्षे रखडून आहे. या प्रकल्पावरही 79 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या एकाही रुग्णालयात रक्त तपासणी केंद्र नसल्यामुळे प्रत्येकाला खासगी लॅबच्या फेऱ्या माराव्या लागतात. पण तेथील फी सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महापालिकेची ही सेवा उपलब्ध झाल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल.

नवीन वर्षाच्या या सुविधेसोबत महापालिकेच्या प्रत्येक दवाखान्यातही मलेरिया, चिकनगुनिया, विटामीन बी-12, बायस्पी, प्रोलेकटीन, युरीन टेस्ट, बॅक्टेरिया, ब्लड आणि एचआयव्ही टेस्टही मोफत करण्यात येणार आहे.