ठाकरे बंधूंच्या युतीमुळे कोण धोक्यात? फडणवीसांनी थेट निकालच सांगितला, म्हणाले…
ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. राज ठाकरे या निवडणुकीत 'बिगेस्ट लूजर' ठरतील आणि त्यांचा फायदा फक्त उद्धव ठाकरेंनाच होईल, असा खळबळजनक दावा फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील २० वर्षांचा राजकीय संघर्ष संपवून एकत्र येत ऐतिहासिक युती केली. या युतीची अधिकृत घोषणा २४ डिसेंबर २०२५ रोजी एका संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. या युतीचा मुख्य उद्देश मुंबईतील मराठी मतांचे विभाजन रोखणे आणि ब्रँड ठाकरे पुन्हा प्रस्थापित करणे असा आहे. मात्र आता आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.
राज ठाकरे हे बिगेस्ट लूजर ठरणार
देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठीला खास मुलाखत दिली. मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीचा सर्वाधिक फायदा कोणाला आणि सर्वाधिक नुकसान कोणाचे, याबद्दल भाष्य केले. राज ठाकरेंचा उपयोग फक्त उद्धव ठाकरेंना होतोय, पण राज ठाकरेंना त्याचा कोणताही राजकीय फायदा मिळणार नाही. या निवडणुकीत राज ठाकरे हे बिगेस्ट लूजर ठरणार आहेत” असे भाकीत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले आहे.
एकत्र येण्याचा काय तीर लागला
गेल्या दीड-दोन वर्षात उद्धव ठाकरे केवळ मुंबई आणि नाशिकच्या परिसरातच फिरत राहिले. दोन वर्षात कोणत्या भागात जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले? आपण हरलो तर आपला ब्रँड राहणार नाही, याच भीतीने ते घराबाहेर पडले नाहीत,” असा टोला त्यांनी ठाकरे बंधूंना लगावला. आता येत्या १६ तारखेच्या निकालानंतर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा काय तीर लागला, हे सर्वांना स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
म्हणून युती केली नाही
भाजपकडे सध्या तीन पक्षांची मजबूत महायुती आहे, त्यामुळे राज ठाकरेंसाठी जागा शिल्लक नाही. जेव्हा ते आमच्यासोबत येण्याचे संकेत देत होते, तेव्हा त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला होता. मात्र, आता त्यांनी हिंदुत्व सोडून पुन्हा आपली जुनीच भूमिका घेतली आहे. रिक्षावाल्यांना मारणे किंवा टॅक्सीवाल्यांना मारणे हे आम्हाला पटणारे नाही, असे सांगत त्यांनी युती न होण्यामागचे कारण स्पष्ट केले.
मी राज ठाकरेंचा शत्रू नाही, ते पुढेही माझे मित्रच राहतील. पण एक राजकीय निरीक्षक म्हणून सांगतो की मला जी राजकीय गणितं दिसतात त्यात राज ठाकरेंचा उपयोग उद्धव ठाकरेंना होतोय. पण तो फायदा उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना होताना दिसत नाही. मत ट्रान्स्फर होताना दिसत नाही. इतक्या निवडणुका पाहिल्यावर मला थोडं समजतं. राज ठाकरे हे बिगेस्ट लूजर होणार आहे. राज ठाकरे बिगेस्ट लूजर ठरणार आहे. एवढी मोठी युती झाली तर ७ चे ७० किंवा २७ तर झाले पाहिजे. पण सध्याची गणिते त्यांच्या विरोधात आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
