लाडक्या बहिणींना लॉटरी, महायुतीच्या वचननाम्यात तीन मोठ्या घोषणा, कसा मिळणार फायदा?
BMC Election 2026 Mahayuti Manifesto Mumbai : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने आपला वचननामा प्रसिद्ध केला आहे. यात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.

Mahayuti Manifesto Mumbai : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना-रिपाई या महायुतीने आपला वचननामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी मुंबईतील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींना खूश करण्यासाठी तीन महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी या घोषणा करण्यात आल्या आहेत. मुंबईतील महिलांचा प्रवास सुसह्य करण्यासोबतच त्यांना उद्योजक बनवण्यासाठी महायुतीने मोठी पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
1. महिलांना बेस्ट बस प्रवासात ५० टक्के सवलत
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ बस सेवेला जागतिक दर्जाचे बनवण्याचा महायुतीचा संकल्प आहे. या अंतर्गत महिलांसाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे:
प्रवासात मोठी सवलत : मुंबईतील सर्व महिला प्रवाशांना बेस्ट बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाईल.
प्रवास सुलभता : प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी बसची संख्या ५,००० वरून १०,००० पर्यंत वाढवण्यात येईल.
सुरक्षितता आणि सुविधा : प्रत्येक बस थांब्यावर सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल डिस्प्ले आणि वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
2. महिला उद्योजकांसाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महायुतीने विशेष लघु उद्योग धोरण जाहीर केले आहे.
बिनव्याजी कर्ज: लाडक्या बहिणींना स्वतःचा लघु उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
कोळी भगिनींसाठी सुविधा : मासळी बाजारात कोळी भगिनींसाठी आधुनिक सोयीसुविधा आणि मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केली जाईल.
3. महिलांचे आरोग्य आणि सुरक्षा
महिलांच्या आरोग्य विषयक समस्यांवर मात करण्यासाठी वचननाम्यात काही विशेष तरतुदी आहेत.
मोफत आरोग्य तपासणी : मुली आणि स्त्रियांसाठी गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनांच्या कर्करोगाची (Breast Cancer) तपासणी महापालिकेद्वारे मोफत करण्यात येईल.
प्रकाश व्यवस्था: रात्रीच्या वेळी सामसूम वाटणाऱ्या भागात आणि पदपथांवर दिव्यांची संख्या वाढवून महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल.
लखपती दिदीकडे त्यांचा प्रवास करू
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी जाहीरनाम्यांच्या घोषणांबद्दल खुलासा केला आहे. मुंबईतील लाडक्या बहिणींना महापालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं, शिलाई मशीन दिलं. आता त्याच्या पलिकडे जाऊन लाडक्या बहिणींना लघुउद्योगासाठी लोन देणार. मागच्यावेळी १ लाखापर्यंतचं लोन दिलं. आता मुंबईच्या लाडक्या बहिणींना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार आहोत. लाडक्या बहिणींकडून लखपती दिदीकडे त्यांचा प्रवास करू. या महापालिकेत मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आणायची आहे. बिल्डिंग प्लानमध्ये एआयचा वापर करू. डीसीआर आणि डीपी आणि जिओ स्पेशल डेटाचा वापर करून एआयचं मॉडेलच सांगेल काय चूक आहे, काय बदल केला पाहिजे हे सांगणार आहे, असे देवेंद्र फडणीस म्हणाले.
