वृक्ष छाटणीची परवानगी अ‍ॅपवरून मिळणार; पावसाळ्यातील जीवितहानी टाळण्यासाठी मुंबई पालिकेचा निर्णय!

पावसाळ्यात झाड कोसळून जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (BMC launches app to grant permit to chop down dangerous trees)

वृक्ष छाटणीची परवानगी अ‍ॅपवरून मिळणार; पावसाळ्यातील जीवितहानी टाळण्यासाठी मुंबई पालिकेचा निर्णय!
प्रतिकात्मक फोटो

मुंबई: पावसाळ्यात झाड कोसळून जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता वृक्ष छाटणी करायची असेल तर महापालिकेच्या ‘MCGM 24 x 7’ या अॅप आणि संकेतस्थळावरून परवानगी घेता येणार आहे. तशी माहितीच मुंबई महापालिकेने दिली आहे. (BMC launches app to grant permit to chop down dangerous trees)

महापालिकेच्या उद्यान खात्याची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी उद्यान विभागाला पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन झाडांची छाटणी पावसाळ्यापूर्वीच करण्याचे आवाहन महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

मुंबईत पावसाळ्याच्या काळात झाडे पडून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन याबाबत सर्व संबंधितांनी महापालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे. यानुषंगाने आवश्यक ती परवानगी प्रक्रिया नि:शुल्क असून परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज पूर्वीप्रमाणेच महापालिकेच्या विभाग कार्यालयात स्वीकारण्यात येत आहे. याचबरोबर नागरिकांना घर बसल्या वृक्ष छाटणी परवानगीसाठी अर्ज करण्याची सुविधा महापालिकेच्या “portal.mcgm.gov.in” या संकेतस्थळावर आणि “MCGM 24×7” या भ्रमणध्वनी आधारित अँड्रॉइडवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच करा

‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५’ नुसार महापालिका क्षेत्रातील झाडांची छाटणी किंवा मृत / धोकादायक झाड कापावयाचे झाल्यास त्याबाबत महापालिकेद्वारे पूर्व परवानगी प्राप्त करून सुयोग्य छाटणी करणे बंधनकारक आहे. तसेच छाटणी झाल्यानंतर झाडाच्या तोडलेल्या फांद्या व इतर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही संबंधितांचीच असल्याचं पालिकेने म्हटलं आहे.

ठेकेदारही करणार झाडांची छाटणी

महापालिका नियुक्त ठेकेदाराद्वारे झाडाची छाटणी करावयाची झाल्यास महापालिकेच्या नियमांनुसार विहित शुल्क पालिकेच्या विभाग कार्यालयाकडे जमा करावे. त्यानंतर सामान्यपणे त्यापुढील 7 दिवसांत झाडांच्या छाटणीची प्रक्रिया केली जाते. महापालिका नियुक्त ठेकेदाराद्वारे छाटणी केल्यास कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याची कार्यवाही ठेकेदाराद्वारेच केली जाते. झाडे छाटणीसाठी ठेकेदाराद्वारे आकारले जाणारे शुल्क हे झाडाचा प्रकार-आकार व‌ संबंधित परिस्थिती यावर आधारित असतो, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

बैठकीतील माहिती

1. वर्ष 2018 मध्ये झालेल्या वृक्ष गणनेनुसार महापालिका क्षेत्रात साधारणपणे 29 लाख 75 हजार 283 झाडे आहेत. यापैकी 15 लाख 63 हजार 701 एवढी झाडे खाजगी आवारांमध्ये आहेत. तर 11 लाख 25 हजार 182 एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त 1 लाख 85 हजार 333 झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित 1 लाख 1 हजार 67 एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत, अशी माहिती उद्यान खात्याद्वारे देण्यात आली आहे.

2. “MCGM 24 x 7” हे भ्रमणध्वनी आधारित अँड्रॉइड ॲप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर व ओटीपी पडताळणी (OTP Verification) केल्यानंतर ॲपमधील ‘गो टू सर्विस’ (Go to service) या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर ‘ट्री ट्रिमिंग’ (Tree Trimming) या लिंक अंतर्गत झाडे छाटणी ची ऑनलाइन परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू होते.

3. महानगरपालिकेच्या “portal.mcgm.gov.in” या संकेतस्थळाद्वारे देखील ऑनलाइन पद्धतीने झाडे छाटणीची परवानगी मिळू शकते. यासाठी महापालिकेच्या सदर संकेतस्थळावर जा. तिथे ‘नागरिकांकरिता’ (For Citizen) या अंतर्गत ‘अर्ज करा’ (Apply) या पर्यायामध्ये ‘उद्यान व वृक्ष’ (Garden & Tree) या पर्यायात झाडे छाटणीच्या परवानगीची ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. (BMC launches app to grant permit to chop down dangerous trees)

 

संबंधित बातम्या:

उद्धव, मी तुझी शिक्षिका, आमच्या वृद्धाश्रमाचं नुकसान झालंय, बाळा भेट मला, 90 वर्षीय शिक्षिकेची आर्त हाक

मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान भाजपला शिकवू नका: प्रवीण दरेकर

Maharashtra News LIVE Update | ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते भूवनेश्वर, कोलकाताची विमान वाहतूक पुढील 6 तासांसाठी बंद

(BMC launches app to grant permit to chop down dangerous trees)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI