मुंबई विमानतळावर पैसे घेऊन परदेशी प्रवाशांना अलगीकरणातून सूट, बीएमसीची मोठी कारवाई

मुंबई विमानतळावर पैसे घेऊन परदेशी प्रवाशांना अलगीकरणातून सूट, बीएमसीची मोठी कारवाई
MCGM Recruitment 2021

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा गैरव्यवहार उघडकीस आलाय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jan 16, 2021 | 1:21 AM

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा गैरव्यवहार उघडकीस आलाय. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून सूट देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसे घेऊन चुकीच्या आणि अवैध पद्धतीने सूट देण्यात येत होती. हा प्रकार लक्षात येताच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने (बीएमसी) हे कृत्य करणाऱ्या दुय्यम अभियंत्यास तत्काळ निलंबित केले. या प्रकारची तातडीने चौकशी देखील सुरु करण्यात आली. याप्रकरणी मनपा कर्मचाऱ्यांसह एकूण 3 जणांविरुद्ध महानगरपालिका प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली (BMC suspend one officer for taking bribe from Foreign tourist for quarantine exemption ).

ब्रिटनमध्ये (यूके) कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर त्याचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. सजगता म्हणून राज्य सरकारसह बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कठोर उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी 21 डिसेंबर 2020 पासून अनेक निर्बंध लादण्यात आलेत. याचाच एक भाग म्हणून युकेसह, इटली, दक्षिण आफ्रिका, युरोप आणि मध्य-पूर्व देशांमधून हवाई मार्गे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.

मुंबई विमानतळावर आतापर्यंत सुमारे 49 हजार 362 परदेशी प्रवासी दाखल

परदेशी प्रवाशांच्या विलगीकरणासाठी विमानतळावर महानगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांची 3 पाळ्यांमध्ये नियुक्ती देखील केली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, बेस्ट, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचेही कर्मचारी मदतीला नेमण्यात आले आहेत. मुंबई विमानतळावर या ठिकाणांहून आतापर्यंत सुमारे 49 हजार 362 प्रवासी दाखल झाले. या प्रवाशांना योग्यरित्या संस्थात्मक विलगीकरण देखील करण्यात आले.

दरम्यान, विलगीकरणातून सूट देण्याबाबतच्या नियमांचे पालन करताना काही अयोग्य घडत असल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी स्वतःहून विमानतळ प्रशासनासह संबंधिताना बारकाईने देखरेख करण्याबाबत गोपनीय पत्र दिलं. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाला (सीआयएसएफ) देखील सतर्क करण्यात आलं. त्यानंतर हा गैरप्रकार उजेडात आला.

विमानतळावर परदेशी प्रवाशांना चुकीच्या आणि अवैध पद्धतीने संस्थात्मक विलगीकरणातून सूट

विमानतळावर नेमण्यात आलेला महानगरपालिकेचे दुय्यम अभियंता (वास्तूशास्त्रज्ञ) दिनेश एस. गावंडे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना चुकीच्या आणि अवैध पद्धतीने संस्थात्मक विलगीकरणातून सूट देत होता. तसेच त्याला अन्य दोघे मदत करत असल्याची बाब केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाने (सीआयएसएफ) हेरली. त्यांनी हा प्रकार रात्रपाळीसाठी नेमणूक केलेल्या सत्रप्रमुख आणि महानगरपालिकेच्या एच/पश्चिम विभागातील कार्यकारी अभियंता वकार जावेद हफिझ यांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकाराची तातडीने दखल घेऊन हफिझ यांनी दिनेश गावंडे यांना विचारणा केली.

आरोपी गावंडेची सीआयएसएफच्या मदतीने झडती घेवून त्याच्याकडून बनावट शिक्के आणि रोख रक्कम जप्त केली. यामध्ये अन्य विभागातील दोघे देखील संशयित म्हणून आढळले. गावंडे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या चुकीच्या कामकाजाबाबत घटनास्थळी पंचनामा करुन, साक्षी नोंदवून प्राथमिक अहवाल महानगरपालिकेचे उपआयुक्त (भूसंपादन) आणि विमानतळ उपाययोजनांचे प्रमुख अनिल वानखेडे यांना सुपूर्द करण्यात आला.

आरोपी दिनेश गावंडेचं तत्काळ निलंबन

या घटनेची तीव्रता लक्षात घेऊन प्राथमिक अहवाल आणि उपलब्ध पुरावे, साक्षीदार यांच्या आधारे महानगरपालिका प्रशासनाने दिनेश गावंडे यांना आज (15 जानेवारी 2021) तत्काळ निलंबित केले. तसेच या प्रकरणाची तातडीने चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने गावंडे याच्यासह एकूण 3 जणांविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात फिर्याद (क्रमांक 0135012) देखील नोंदवण्यात आली. पोलिसांनी गावंडेसह तिन्ही संशयितांना अटक केली आहे.

हवाईमार्गे प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या प्रवाशांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. नियमांची कठोर अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे, असे आवाहन यानिमित्ताने प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

हेही वाचा :

मुंबईतील शाळा कधी सुरु होणार? BMC कडून परिपत्रक जारी

Sonu Sood Vs BMC | सोनू सूदला मोठा दिलासा, कोर्टाकडून निकाल राखीव

कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल, परेलमध्ये साठवणूक, एका दिवसात किती जणांना लस?

व्हिडीओ पाहा :

BMC suspend one officer for taking bribe from Foreign tourist for quarantine exemption

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें