मालमत्ता कराची 20 हजार कोटींची थकबाकी, मुंबई महापालिका सक्त दंडवसुलीच्या तयारीत

मालमत्ताधारकांना 8 एप्रिल 2021 पर्यंत थकबाकी भरण्याची मुदत देण्यात आली आहे (BMC property tax in Mumbai)

  • विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 9:28 AM, 3 Mar 2021
मालमत्ता कराची 20 हजार कोटींची थकबाकी, मुंबई महापालिका सक्त दंडवसुलीच्या तयारीत
मुंबई महापालिका

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) उत्पन्नात वाढ होण्यासाठी मालमत्ता कराच्या (Property Tax) जास्तीत जास्त वसुलीवर भर दिला जात आहे. मुंबईत मालमत्ता कराची 20 हजार कोटींची थकबाकी आहे. थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांना 8 एप्रिलची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दंड वसुली केली जाणार आहे. (BMC to fine for unpaid property tax in Mumbai)

8 एप्रिल 2021 पर्यंत मुदत

मालमत्ता कराची जास्तीत जास्त वसुली करण्यावर मुंबई महापालिकेचा भर आहे. मात्र वारंवार सूचना करुनही काही मालमत्ताधारक थकित रक्कम भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा मालमत्ताधारकांना 8 एप्रिल 2021 पर्यंत थकबाकी भरण्याची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा 9 एप्रिलपासून संबंधितांकडून अतिरिक्त दंड आकारला जाणार आहे.

पालिकेची आर्थिक बाजू कमकुवत

उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला जकात कर रद्द करण्यात आल्यानंतर पालिकेची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. ही तूट मालमत्ता कराच्या माध्यमातून भरुन काढण्यासाठी पालिकेने अनेक प्रयत्न केले. मात्र मालमत्ता कर भरण्यासाठी आवाहन करुनही नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत.

साडेतीनशे कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत

या मोहिमेअंतर्गत गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तीन हजार 392 मालमत्तांना कारवाईचा बडगा दाखवण्यात आला आहे. यापैकी एक हजार 376 कोटी रुपये कर थकवणाऱ्या 3,179 मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आठवडाभरातच सुमारे साडेतीनशे कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते.

20 हजार कोटींची थकबाकी

अद्याप मालमत्ता कराची सुमारे 20 हजार कोटींची थकबाकी आहे. यापैकी किमान दहा टक्के वसूल केले, तरी दोन हजार कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा होतील. मालमत्ता कराचे लक्ष्य चुकणार असल्याने महापालिकेने त्यात सुधारणा करत सन 2020-21 या आर्थिक वर्षात 4500 कोटी वसूल करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. (BMC to fine for unpaid property tax in Mumbai)

यापैकी आतापर्यंत केवळ दोन हजार 87 कोटी रुपये वसूल झाले आहेत. यामुळे 8 एप्रिलपर्यंत थकीत रक्कम न भरल्यास संबंधित मालमत्ताधारकाला अतिरिक्त दंड भरावा लागेल, असा इशारा पालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याने दिला आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता

मालमत्ताधारक – चार लाख 50 हजार
निवासी – एक लाख 27 हजार
व्यावसायिक – 67 हजारांपेक्षा अधिक
औद्योगिक – सहा हजार
भूभाग आणि इतर – 12 हजार 156

संबंधित बातम्या :

BMC अर्थसंकल्पात शिवसेनेकडून आकड्यांचा जुगाड; मुंबईकरांवर कर्जाचा बोजा पडणार?

(BMC to fine for unpaid property tax in Mumbai)