Central Railway Megablock : आज पुन्हा तुमचा खोळंबा होणार, मध्य रेल्वेचा दोन दिवस मेगाब्लॉक, वेळापत्रकात काय बदल?
मध्य रेल्वेने अंबरनाथ स्थानकात नवीन पादचारी पुलासाठी (FoB) गर्डर टाकण्याकरिता शुक्रवार आणि शनिवारी रात्री दीड तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी मुंबईहून कर्जत-अंबरनाथ मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने अंबरनाथ रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुलाचा (FoB) गर्डर टाकण्याचे महत्त्वाचे काम हाती घेतले आहे. यासाठी आज शुक्रवार (७ नोव्हेंबर) आणि उद्या शनिवार (८ नोव्हेंबर) अशा दोन रात्री विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रात्रीच्या वेळी लोकल तसेच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वेचा हा ब्लॉक मध्यरात्री १ वाजून ५० मिनिटांपासून ते ३ वाजून २० मिनिटांपर्यंत असणार आहे. शुक्रवार आणि शनिवार अशा दोन्ही रात्री दीड तास हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळेत जुना गर्डर काढून नवा गर्डर बसवण्याचे काम वेगाने केले जाणार आहे. या ब्लॉकचा थेट परिणाम रात्रीच्या वेळी मुंबईहून कर्जत-अंबरनाथ मार्गावर प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांवर होणार आहे. या काळात मुंबई आणि उपनगरादरम्यान धावणाऱ्या काही लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत.
पर्यायी वाहतुकीचा विचार करावा
या ब्लॉकमुळे मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटांनी सीएसएमटीहून अंबरनाथकडे जाणारी लोकल तसेच मध्यरात्री १२ वाजून १२ मिनिटांनी सीएसएमटीहून कर्जतकडे रवाना होणारी लोकल रद्द असेल. तर अंबरनाथहून रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सीएसएमटीकडे जाणारी लोकलही रद्द करण्यात येणार आहे. यामुळे ज्या प्रवाशांना रात्री १२ नंतर प्रवास करायचा आहे, त्यांनी ठाण्यापर्यंत लोकल धावणार हे लक्षात घेऊन पर्यायी वाहतुकीचा विचार करावा.
लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम
लोकल गाड्यांसोबतच लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांनाही या ब्लॉकमुळे आपला मार्ग बदलावा लागला आहे. या ब्लॉकमुळे दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या मुख्य मार्गाऐवजी पनवेल मार्गे वळवण्यात येणार आहेत. भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस आणि विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या कर्जत येथून पनवेल आणि दिवा मार्गे वळवून पुढे ठाण्याला आणि नंतर नियोजित स्थळी रवाना होतील. यामुळे काही एक्सप्रेस गाड्यांना पनवेल मार्गे प्रवास करावा लागणार असल्याने वेळेत थोडा बदल होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
तर दुसरीकडे हैदराबादहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना या ब्लॉकचा फटका बसणार आहे. हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस या गाडीला ब्लॉक संपेपर्यंत म्हणजेच रात्री ३ वाजून २० मिनिटांपर्यंत वांगणी रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन रेल्वेला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
