मुंबई लोकलमध्ये 8 कोटींच्या चेन स्नॅचिंग, सापडल्या केवळ….

मुंबई लोकलमध्ये 8 कोटींच्या चेन स्नॅचिंग, सापडल्या केवळ....

मुंबई : गेल्या काही वर्षांत चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये मोट्या प्रमाणात वाढ झाली आहे. रेल्वे स्टेशनवर सुरक्षेच्यादृष्टीने मुंबईत कोट्यावधी रुपये खर्च करुन प्रत्येक स्टेशन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. तरीही चेन स्नॅचिंगचे प्रकार कमी झालेले नाहीत. उलट या गुन्ह्यांच्या प्रमाणात अधिक वाढ झाल्याचं दिसून आलं. गेल्या सहा वर्षात मुंबईत 8 कोटी 28 लाख 24 हजार 399 रुपये किंमतीच्या चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली.

शकील अहमद शेख यांनी लोहमार्ग पोलीस विभागाकडे 2013 पासून 2018 पर्यंत मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत किती चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची नोंद झाली, तसेच किती गुन्ह्यांची उकल झाली, किती किंमतीची मालमत्ता चोरी झाली आहे. पोलिसांनी किती परत मिळवून दिली, याबाबतची माहिती विचारली होती.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 1 जानेवारी 2013 पासून डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 2084 चेन स्नॅचिंगच्या  गुन्ह्यांची नोंद झाली. एकूण सहा वर्षात 8 कोटी 28 लाख 24 हजार 399 रुपये किंमतीची मालमत्ता चोरीला गेली. तर, फक्त 860 गुन्ह्यांची उकल झाली. पोलिसांनी 3 कोटी 32 लाख 39 हजार 921 रुपये इतकी मालमत्ता शोधून काढली.

कोणत्या वर्षात किती चेन स्नॅचिंगच्या घटना?

मुंबईत 2013 मध्ये एकूण 62 चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. यात 20 लाख 37 हजार 885 रुपये किंमतीची मालमत्ता चोरीला गेली. तर यातील फक्त 17 गुन्हे उघड झाले असून 6 लाख 93 हजार 250 रुपये किंमतीची मालमत्ता शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं. त्यानंतर 2014 मध्ये एकूण 74 चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. यात 23 लाख 67 हजार 789 रुपये किंमतीची मालमत्ता चोरीला गेली. यातील फक्त 31 गुन्हे उघडकीस आले. त्यात 9 लाख 53 हजार 607 रुपये किंमतीची मालमत्ता पोलिसांनी शोधून काढली.

2015 मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत 244 चेन स्नॅचिंगच्या घटना समोर आल्या. यात 86 लाख, 92 हजार 576 रुपये किंमतीची मालमत्ता चोरीला गेली. तर यातील केवळ 77 गुन्हे उघड झालेत. त्यात पोलिसांनी 22 लाख 64 हजार 043 रुपये किंमतीची मालमत्ता परत मिळवली. त्यानंतर 2016 मध्ये 309 चेन स्नॅचिंगच्या घटना समोर आल्या. त्यात 1 कोटी 20 लाख 53 हजार 333 रुपये किंमतीची मालमत्ता चोरीला गेली. त्यानंतर यातील 123 गुन्हे उघड केले असून त्यामार्फत 33 लाख 71 हजार 908 रुपये किंमतीची मालमत्ता परत मिळवली आहे.

त्यानंतर 2017 मध्ये एकूण 341 चेन स्नॅचिंगचे प्रकार समोर आलेत. त्यात 1 कोटी 42 लाख 92 हजार 631 रुपये किंमतीची मालमत्ता चोरीला गेली. चोरीच्या वाढत्या प्रकरणानंतरही पोलिसांमार्फत 128 गुन्हे उघड केले. त्यात 40 लाख 33 हजार 259 रुपये मालमत्ता जप्त करण्यात आली.

दरम्यान, गेल्यावर्षी म्हणजे 2018 मध्ये 314 चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याचं समोर आले. त्यात 1 कोटी 49 लाख 27 हजार 222 रुपये किंमतीची मालमत्ता चोरीला गेली. यातील पोलिसांनी फक्त 80 गुन्हे उघड केले असून त्यात 30 लाख 32 हजार 343 रुपये मालमत्ता जप्त करण्यात आली.

जबरदस्ती करुन चेन स्नॅचिंगच्या घटना किती?

रेल्वे फलाटावर किंवा ट्रेनमध्ये जबरदस्ती चेन स्नॅचिंगच्या घटना अनेकदा समोर येतात. यानुसार, 2013 मध्ये जबरदस्तीने चेन स्नॅचिंग केल्याचे 273 प्रकरणं समोर आली आहेत. त्यात 1 कोटी 08 लाख, 83 हजार 982 रुपये किंमतीची मालमत्ता चोरीला गेली. त्यातील 144 गुन्हे उघड झाले असून 40 लाख 65 हजार 706 रुपये किंमतीची मालमत्ता परत मिळाली आहे.

त्यानंतर 2014 मध्ये 254 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यात 1 कोटी 03 लाख 46 हजार 988 रुपये किंमतीची मालमत्ता चोरी झाली आहे. त्यातील 133 गुन्हे उघड झाले आहेत. यात 37 लाख 72 हजार 819 रुपयाची मालमत्ता जप्त केली आहे. तर 2015 मध्ये 160 जबरदस्तीने चेन स्नॅचिंग चोरीच्या घटनांची नोंद झाली. त्यात 72 लाख, 19 हजार 135 रुपये किंमतीची मालमत्ता चोरीला गेली आहे. त्यातील केवळ 86 गुन्हे उघड झाले असून त्यातून 31 लाख 15 हजार 036 रुपये किंमतीची मालमत्ता परत मिळाली आहे.

यानंतर 2016 मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत 8 चेन स्नॅचिंगच्या घटना समोर आल्या. यात 4 लाख, 36 हजारांची मालमत्ता चोरीला गेली. तर यातील 6 गुन्हे उघड झालेत. त्यात पोलिसांनी 2 लाख 54 हजारांची मालमत्ता परत मिळवली. त्यानंतर 2017 मध्ये एकूण 26 चेन स्नॅचिंगच्या घटना समोर आल्या. त्यात 11 लाख 38 हजार 422 रुपये किंमतीची मालमत्ता चोरीला गेली. त्यात फक्त 22 गुन्हे उघड झाले असून त्यातून 8 लाख 36 हजार 548 रुपये किंमतीची मालमत्ता परत मिळाली आहे.

तर गेल्यावर्षी म्हणजेच 2018 मध्ये 20 चेन स्नॅचिंगच्या घटना समोर आल्यात. त्यात 12 लाख 11 हजार 600 रुपये किंमतीची मालमत्ता चोरीला गेली. त्यातील 13 गुन्हे उघड झाले असून त्यातून 3 लाख 91 हजार 100 रुपये किंमतीची मालमत्ता परत मिळाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI