कोस्टल रोडचं भूमिपूजन करायला उद्धव ठाकरे कोणत्या संवैधानिक पदावर होते? फडणवीस यांचा खरमरीत सवाल
मुंबई कोस्टल रोड आणि मेट्रो ३ चे श्रेय उद्धव ठाकरेंचे नाही, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोस्टल रोडच्या परवानग्यांपासून ते कामातील अडथळ्यांपर्यंत फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं?

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्याच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरुन राजकारणात घमासान सुरु आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग आणि मुंबई अॅक्वा मेट्रो या प्रकल्पांमुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलला आहे. आताच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत याच प्रकल्पाच्या श्रेयवादावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. मुंबईतील कोस्टल रोड, भूमिगत मेट्रो आणि समृद्धी महामार्ग या कोणत्याच गोष्टीचं श्रेय उद्धव ठाकरेंचे नाही, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठीला खास मुलाखत दिली. मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडचे श्रेय कोणाचे, यावर भाष्य केले. कोस्टल रोडची संकल्पना किंवा त्याच्या परवानग्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे कोणतेही योगदान नाही, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
केंद्राने परवानगी देताना अट घातली
कोस्टल रोडची संकल्पना अनेक दशके जुनी होती, पण ती सत्यात उतरवण्यात ठाकरे गटाचे कोणतेही योगदान नाही. कोस्टल रोडची चर्चा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही होती, मात्र कायद्यातील अडचणींमुळे २५ वर्षे हा प्रकल्प रखडला होता. कोस्टल रोडसाठी समुद्रात भरणी करावी लागणार होती, ज्याला भारताच्या तत्कालीन कायद्यात परवानगी नव्हती. मी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्राकडे पाठपुरावा केला. दोन वर्षांत पाच मोठ्या बैठका घेतल्या. तीन पर्यावरण मंत्री बदलले, पण आम्ही हार मानली नाही. अखेर केंद्राला पटवून दिले की या भरणीतून आम्ही पर्यावरणाचे संरक्षणच करणार आहोत. पण केंद्राने परवानगी देताना अट घातली होती की, या रिकाम्या जागेवर कोणतीही व्यावसायिक इमारत उभी राहणार नाही. त्यामुळेच आज तिथे विस्तीर्ण उद्याने आणि वॉकिंग ट्रॅक तयार होऊ शकले आहेत, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी यांनी दिले.
हे कोत्या मनाचे
या मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी २०१७-१८ मधील एका प्रसंगाचा उल्लेख केला. कल्याणच्या उद्घाटनाला मी त्यांचे सर्व मंत्री बोलावले. पालकमंत्री बोलावले. उद्धव ठाकरे कोणत्या संवैधानिक पदावर होते. अशा प्रकारचे उद्घाटन करण्याचा त्यांना अधिकार होता का नव्हता. मलाच होता. मी मुख्यमंत्री होतो. मी मोठं मन दाखवलं. हे कोत्या मनाचे होते. यांच्या मनात २०१७चं शल्य होतं. आम्ही वेगळे लढलो. त्यांना वाटलं की हे भाजपवाल्यांची काय औकात आहे. हे काय माझ्या पुढे लढतील. जेव्हा ते ८४ आणि आम्ही ८२ आले. माझा महापौर बनत होता. मी सोडलं. ते शल्य त्यांच्या मनात होतं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ठाकरे सरकारने खोडा घातला
पृथ्वीराज बाबांशी तुमचे संबंध होते. बाबा म्हणायचे हा माझा पेट प्रोजेक्ट होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईपर्यंत त्यांनी एक परवानगी आणल्या नाही. २२ परवानग्या होत्या. यांनी मला रिक्वेस्ट करून कार्पोरेशनला काम दिलं आणि मला भूमिपूजनाला बोलावलं. याच्याशी यांचं काहीच श्रेय नाही. दुसऱ्याचा मुलगा आपल्या मांडीवर बसवून गौरव करत आहेत ते. तो मुलगा त्यांचाच नाही. त्याला मी दिला. फक्त कोस्टल रोडच नव्हे, तर मेट्रो ३ (भूमिगत मेट्रो) आणि समृद्धी महामार्गाच्या कामातही ठाकरे सरकारने खोडा घातल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
पुष्पक विमान रामायणात होते, पण ते राईट ब्रदर्सने बनवले असे आपण म्हणतो. तसेच कोस्टल रोडच्या संकल्पनेचे आहे, प्रत्यक्ष काम कोणी केले हे महत्त्वाचे आहे,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
