राज्याच्या राजकारणातील अत्यंत मोठी बातमी; राज ठाकरे-फडणवीस-शिंदेंमध्ये गुप्त बैठक
Eknath Shinde Devendra Fadnavis Raj Thackeray Meeting Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे या तीन नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी ही मुंबईत महत्वाची बैठक पार पडली आहे. वाचा सविस्तर बातमी...
राज्यात सध्या विधानसभेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं मनसेने जाहीर केलेलं असतानाच आता राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. महायुतीत पुन्हा एकदा ‘बिनशर्त’ पाठिंब्यावर चर्चा झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुप्त बैठक झाली आहे. या बैठकीतील तपशील समोर आले आहेत. काही निवडक जागांवर महायुती राज ठाकरेंना पाठिंबा देणार असल्याचं कळतं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी महायुतीला आपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र आता विधानसभेला त्यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. अशावेळी फडणवीस, शिंदे, राज ठाकरे यांच्यात झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण आहे.
बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. काही निवडक जागांवर महायुती राज ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. शिवडी, वरळी, माहीमसह काही जागांवर महायुती राज ठाकरेंना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर राज्याच्या राजकारणात त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
राज ठाकरे-फडणवीस-शिंदे बैठकीचे तपशील
शनिवारी रात्री 12 वाजता देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे नागपुरातून मुंबईत आले. रात्री 12 वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा मुंबई विमानतळावरून निघाला. या दोनही नेत्यांच्या वाहनांचा ताफा हा वरळीपर्यंत आला. नंतर हा ताफा अज्ञातस्थळी गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघाला.
मध्यरात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या तीन नेत्यांमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली. राज ठाकरेंसोबत झालेल्या गुप्त बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पहाटे तीन वाजता सागर बंगल्यावर गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तीन वाजता वर्षा बंगल्यावर पोहोचले.