राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ‘राजीनामा’, नाना पटोले यांची सर्वात तिखट प्रतिक्रिया

चेतन पाटील, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 5:04 PM

भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आता राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट झालंय. त्यांच्या राजीनाम्याच्या बातमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 'Tv9 मराठी'ला प्रतिक्रिया दिलीय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि 'राजीनामा', नाना पटोले यांची सर्वात तिखट प्रतिक्रिया

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे राज्यपाल पदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केलीय. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस असल्याचं राज्यपालांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना सांगितलंय. भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या या वृत्तामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वीदेखील अशीच चर्चा समोर आली होती. त्यानंतर आता राजभवनाकडून अधिकृतपणे असं पत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी आता राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट झालंय. त्यांच्या राजीनाम्याच्या बातमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‘Tv9 मराठी’ला प्रतिक्रिया दिलीय. विशेष म्हणजे नाना पटोले यांनी तर या प्रकरणावर अतिशय तिखट प्रतिक्रिया दिलीय.

“राज्यपाल भवन हे भाजप भवन झालेलं आहे, असा आक्षेप काँग्रेसचा होता. राज्यपाल हे महामहीम राष्ट्रपतींशी निगडीत असतात. त्यांना राजीनामा द्यायचा असता तर त्यांनी आपलं म्हणणं राष्ट्रपतींकडे पाठवायला हवं होतं. म्हणजे आमचा जो आक्षेप होता तो बरोबर होता”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

“या पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक व्यवस्थेचं पालन करणारे तेवढ्याच जबाबदारीचे राज्यपाल असले पाहिजे होते. पण तसं झालं नाही. म्हणून आमचं सातत्याने म्हणणं होतं की, राज्यपाल भवन हे भाजप भवन झालेलं आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

“छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा सातत्याने अवमान करणं, आणि ते भाजपलाही आवडत होतं. त्यांच्या मंत्र्यांनीसुद्धा त्याबाबत वक्तव्य केलंय. त्यामुळे अशा विचारांचा राज्यपाल आमच्या राज्यात नको, अशा प्रकारचं म्हणणं मांडत मी राष्ट्रपतींना अनेकदा पत्र लिहिलं. त्यावर कारवाई होत नव्हती”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

“राज्यपालांवर भाजपचा मोठा आशीर्वाद होता. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अवमान करणं त्यांना सगळ्यांना आवडत होतं. म्हणून उद्या जाण्याऐवजी हटवलं पाहिजे. त्यांचा राजीनामा घेऊ नये तर त्यांना हटवलं पाहिजे. अशा प्रकारच्या विचारांच्या व्यक्तीची महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून गरज नाही”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया

“राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य करावं, हे महाराष्ट्रातील काही नेत्यांना पाहिजे होतं. त्यामुळे त्यांच्याकडून ते करुन घेत होते. म्हणून त्यांना जबाबदारीतून मुक्त केलं जात नव्हतं, असं मला वाटतं”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दिली.

“आता त्यांनी स्वत:हून मुक्त करा अशी मागणी केली असेल तर ज्यांनी त्यांना मुक्त करायचंय त्यांनी त्यांना मुक्त करावं. महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान थांबवावा, असं मला वाटतं”, असंही ते यावेळी म्हणाले.

“राज्यपालांनी भाजपचाच अजेंडा राबवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या एकंदरीत नेहमीच्या कार्याला अनुसरुनच त्यांनी राष्ट्रपतींकडे राजीनाम्या देण्याऐवजी पंतप्रधान मोदींकडे मागणी केली असावी. या घटनात्मक पदाची दर्जा आधीच खालावली आहे”, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

हे सुद्धा वाचा

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची जनभावना ओळखून राजीनामा द्यायला हवा होता. महाराष्ट्राचा अपमान करुन, महाराष्ट्राच्या महापुरुषांबद्दल वाट्टेल ते बोलून आता ते राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करत आहेत म्हणजे दिल्लीश्वरांनी तुमच्या नाकावर टिचून तुम्ही आमचं काहीच करु शकत नाहीत. आम्ही जे पाहिजे तेच करु, असा इशारा एकप्रकारे महाराष्ट्राच्या लोकांना देवून टाकला. आता त्यांनी राजीनामा दिला काय आणि राहिला काय, महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान झाला, त्याची परतफेड काय होणार?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI