फक्त काही रुपये भरा आणि जास्त जागा मिळवा; धारावीतील पुनर्विकास प्रकल्पाची नवी योजना काय?
धारावी पुनर्विकास योजनेत पात्र व्यावसायिकांना मोफत २२५ चौरस फूट जागेव्यतिरिक्त अतिरिक्त जागा बांधकाम खर्च भरून मिळणार आहे. २४ ऑगस्ट पर्यंत संमतीपत्र सादर करावे लागेल. गुमास्ता परवाना, बेस्ट मीटरचे कागदपत्रे आवश्यक आहेत. भाडेकरारधारकांनाही १०% जागा आरक्षित. यामुळे धारावीतील उद्योगांना सुरक्षित भविष्य आणि स्थानिकांना रोजगार मिळेल.

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील व्यावसायिक आणि औद्योगिक गाळेधारकांसाठी एक गुडन्यूज देण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, पुनर्विकासात मोफत मिळणाऱ्या 225 चौरस फुटांच्या जागेपेक्षा जास्त जागा हवी असणाऱ्या पात्र गाळेधारकांना आता अतिरिक्त जागा घेता येणार आहे. यासाठी त्यांना केवळ वाढीव जागेच्या बांधकामाचा खर्च द्यावा लागेल.
कशी असेल प्रक्रिया?
1 जानेवारी 2000 किंवा त्यापूर्वीपासून तळमजल्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक आणि औद्योगिक गाळेधारकांना या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी त्यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेला गुमास्ता परवाना आणि बेस्ट प्राधिकरणाचे एलटी-II मीटर यांसारखी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. या अतिरिक्त जागेसाठीचा खर्च रेडी रेकनर दरानुसार आणि टेलिस्कोपिक रिडक्शन पद्धतीने (telescopic reduction method) आकारला जाईल.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गाळेधारकांना 24 ऑगस्टपर्यंत संमतीपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. जर हे संमतीपत्र दाखल केले नाही, तर त्यांना अतिरिक्त जागा नको आहे, असे मानले जाईल.
केवळ पात्र गाळेधारकच नव्हे, तर मालकी हक्काचा गाळा नसलेल्या आणि भाड्याने व्यवसाय करणाऱ्या अपात्र गाळेधारकांनाही या पुनर्विकासात सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धोरणानुसार, पुनर्विकसित इमारतीमधील 10 टक्के जागा अशा अपात्र व्यावसायिकांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. यामुळे, धारावीतील उद्योगधंद्यांना सुरक्षित भविष्य मिळेल आणि इथली उद्यमशीलता टिकून राहील.
वॉक टू वर्क संकल्पना
धारावी अधिसूचित क्षेत्रातील (DNA) पुनर्वसित आणि नवीन व्यावसायिकांना 5 वर्षांसाठी राज्य वस्तू व सेवा करातून (SGST) सूट दिली जाईल. जागेचा मालकी हक्क मिळाल्याने भविष्यात व्यवसाय वाढवण्यासाठी गाळेधारकांना बँकांकडून सहजपणे कर्ज उपलब्ध होईल. या सर्व निर्णयामुळे धारावीतील उद्योगधंद्यांना संरक्षण मिळेल आणि स्थानिक रहिवाशांना त्यांच्या घरांजवळच रोजगाराची संधी (Walk to Work) मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या प्रकल्पाची एक मुख्य संकल्पना “वॉक टू वर्क” आहे. याचा अर्थ, धारावीतील लोकांना त्यांच्या घरापासून जवळच काम करण्याची संधी मिळावी. यामुळे प्रवासातील वेळ आणि खर्च वाचेल, तसेच जीवनमान सुधारेल. या धोरणामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळण्यासोबतच धारावीच्या आर्थिक आणि सामाजिक संरचनेत सुधारणा होण्यास मदत होईल.
धारावीत उद्योगांना पुनर्विकासात सामावून घेणे गरजेचे
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा शहरी पुनर्विकास प्रकल्प आहे. यामध्ये केवळ रहिवाशांना घरेच नव्हे, तर येथील उद्योगांना आणि व्यवसायांनाही कायमस्वरूपी जागा देऊन त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे. धारावीची ओळख केवळ झोपडपट्टी म्हणून नसून, लघु उद्योगांचे आणि कारागिरांचे केंद्र म्हणूनही आहे. त्यामुळे या उद्योगांना पुनर्विकासात सामावून घेणे अत्यावश्यक मानले गेले आहे.
