गाडगेबाबांचे विचार जगभर पोहोचवण्याची गरज; ‘श्री गाडगे बाबा’ जीवनचरित्राच्या दहाव्या आवृत्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

संत गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्राचे विविध भाषांमध्ये भाषांतर करून त्यांचे कार्य जगभरात पोहचवले पाहिजे, त्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सर्व मदत करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

गाडगेबाबांचे विचार जगभर पोहोचवण्याची गरज; 'श्री गाडगे बाबा' जीवनचरित्राच्या दहाव्या आवृत्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : श्री गाडगेबाबा महाराजांच्या विचारसरणीनुसार आमचे सरकार काम करीत असून, त्यांच्या जीवनचरित्राचे विविध भाषांमध्ये भाषांतर करून त्यांचे कार्य जगभरात पोहचवले पाहिजे, त्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सर्व मदत करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (Gadge Baba’s thoughts need to be spread all over the world; Uddhav Thackeray Published biography of ‘Shri Gadge Baba’)

प्रबोधनकार ठाकरे लिखित ‘श्री गाडगेबाबा’ जीवनचरित्राच्या संत गाडगे महाराज मिशनच्या वतीने प्रकाशित दहाव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री तथा गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार उल्हास पवार, इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार, मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते – पाटील आदी उपस्थित होते.

संत गाडगेबाबांनी अंधश्रद्धेवर आघात करून खरा धर्म शिकवला, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, धर्म जगणे आणि धर्म जपणे यातील अंतर आपल्याला समजले पाहिजे. धर्म जगायचा असतो हे बाबांनी कृतीतून दाखवून दिले. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, गरीब मुलामुलींना शिक्षण आदी दशसूत्रीतून हाच खरा धर्म आहे हे त्यांनी असंख्य व्याख्यानांतून जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांनी कीर्तनातून लोकशिक्षण घडवले.

ते पुढे म्हणाले, आजोबा प्रबोधनकारांनी लिहिलेल्या आणि वडील बाळासाहेब ठाकरे यांनी मुखपृष्ठ चितारलेल्या या जीवनचरित्राचे प्रकाशन मुख्यमंत्री म्हणून करताना मला मनापासून आनंद होत आहे. प्रबोधनकार आणि संत गाडगेबाबा यांच्यात एक अनोखे नाते होते. गाडगेबाबांनी वक्तृत्वातून समाजातील अनिष्ठ प्रथांविरुद्ध लोकांचे प्रबोधन केले. त्यांनी केवळ कीर्तने केली नाहीत तर शाळा उभारल्या, अन्न छत्रे सुरू केली, धर्मशाळा बांधल्या. गाडगे बाबांचे विचार पुढे नेण्यासाठी मिशनने काम करत राहावे, महाराष्ट्र शासन मिशनच्या पाठीशी खंबीर उभे राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.

महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. ठाकूर म्हणाल्या, संत गाडगेबाबा हे कृतीमधील आणि विचारांमधील स्वच्छता जोपासणारे संत होते. गाडगेबाबा, प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा देशामध्ये पोहोचवायचा असेल तर त्यांचे पुस्तकरूपी जीवन चरित्र प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था व्हायला हवी. धर्म, जातीभेदांमध्ये वाढ करणाऱ्या विभाजनवादी शक्तींबाबत जनजागृती करायची असेल तर हे पुस्तक उपयुक्त ठरेल. गाडगेबाबांची 2026 मध्ये 150 वी जयंती असून त्यानिमित्ताने मिशनमार्फत विविध उपक्रम हाती घेतले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. मंजुश्री पवार आणि उल्हास पवार यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रबोधनकार आणि संत गाडगेबाबा यांच्यातील विचार आणि कृतीतील साम्याविषयी भाष्य केले. जात, पात, धर्म यातील फोलपणा गाडगेबाबांनी आपल्या वाणीतून लोकांना दाखवून दिला. त्यासाठी लोकांच्या बोली भाषेतून संवाद साधला. प्रबोधनकार, गाडगेबाबांचे विचार इतिहासाचे भाग नाही तर वर्तमानाला दिशा देणारे आहेत. वैयक्तिक हितसंवर्धनाशिवाय परिवर्तन होऊ शकते हे गाडगेबाबा आणि प्रबोधनकार यांनी सिद्ध केले, असे यावेळी मनोगतात व्यक्त केले.

यावेळी प्रारंभी मिशनच्यावतीने मुख्यमंत्री ठाकरे यांना संत गाडगेबाबा यांची प्रतिमा आणि संदेश असलेले सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच डॉ. मंजुश्री पवार यांच्याकडून राजर्षी शाहू महाराज पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ भेट देण्यात आले.

इतर बातम्या

‘ते’ ताट राज्य सरकारच हिसकावून घेतंय; चंद्रशेखर बावनकुळेंचा पवारांवर पलटवार

शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचत नाहीत, युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे : देवेंद्र फडणवीस

आधी अश्लील संवाद, नंतर क्राईम ब्रांचमधून फोन, वृद्धांना फसविण्यासाठी नागपुरात विचित्र प्रकार

(Gadge Baba’s thoughts need to be spread all over the world; Uddhav Thackeray Published biography of ‘Shri Gadge Baba’)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI