हृदयद्रावक घटना! कानात हेडफोन घालून रुळ ओलांडणाऱ्या महिलेला वाचयला गेला… पण नियतीने केला घात, त्या महिलेचं काय झालं?
अंबरनाथ येथील मोरीवलीत राहणाऱ्या एका महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच तिला वाचवण्यासाठी धावून गेलेल्या 29 वर्षीय तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे.

स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तरुण पिढीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासोबतच हेडफोनचा वापरही वाढला आहे. अनेकजण काम करताना, प्रवास करताना किंवा अगदी रस्त्यावर चालतानाही हेडफोन लावून असतात. मात्र, अंबरनाथ येथे हेडफोनच्या वापरामुळे एका तरुणीचा आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मोरीवली गावाजवळ घडली आहे.
नेमकं काय घडलं?
अंबरनाथ येथील मोरीवली गावात राहणारी 45 वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मी नगर येथील 29 वर्षीय आतिष रमेश आंबेकर हे दोघे आनंदनगर एमआयडीसीतील एकाच कंपनीत काम करत होते. 20 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोघेही कामावरून घरी परतत होते. आतिष वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबीन रोडजवळील मोरीवली गावात गेला होता.
वाचा: सोनमला जराही पश्चाताप नाही, कैद्यांसोबत मजामस्ती सुरु; तुरुंगात नेमकं काय सुरु
एकुलता एक मुलगा
वैशाली या हेडफोन लावून फोनवर बोलत रेल्वे रुळ ओलांडत होत्या. यावेळी रेल्वे येत असल्याचे आतिष आणि इतर काही लोकांनी पाहिले. त्यांनी वैशाली यांना हाक मारली, परंतु हेडफोनमुळे त्यांचे लक्ष नव्हते. वैशाली यांना वाचवण्यासाठी आतिष धावला, पण दुर्दैवाने रेल्वेने दोघांनाही धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. आतिष हा त्याच्या वृद्ध आई-वडिलांचा एकमेव आधार होता आणि त्याच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झाली होती. त्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वैशाली यांच्या पश्चात पती, एक मुलगी आणि 22 वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे पती रिक्षाचालक असून, यंदा मुलीचे लग्न करण्याची तयारी कुटुंब करत होते. अशा परिस्थितीत वैशाली यांच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार हरवला आहे.
या घटनेनंतर मोरीवली गाव ते बी केबीन रोड या मार्गावर पादचारी पूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मोरीवली गावचे माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी अनेकदा पादचारी पूल आणि बाजूला उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यावर याकडे लक्ष देणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
