Kishori Pednekar: टँकरवाल्यांची चांदी करायची असेल तर..; किशोरी पेडणेकरांचा मुंबई महापालिकेवर निशाणा
किशोरी पेडणेकर यांनी मंडपेश्वर शाळेच्या जागेवरून बिल्डरला अभय दिल्याचा आरोप केला. एसआरएच्या पत्रावरून त्यांनी आयुक्तांना सवाल केला आहे. तर प्रदूषण, रस्ते सफाई आणि महायुतीच्या कामकाजावर त्या आक्रमक झाल्या आहेत.

मुंबईतील विविध नागरी प्रश्नांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. मंडपेश्वर शाळेच्या जागेचा बिल्डरकडून वापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर मुंबईतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने आखलेल्या रस्ते धुण्याच्या नियोजनालाही त्यांनी विरोध दर्शवला. 233 टँकरच्या माध्यमातून रस्ते धुण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी एसआरएच्या पत्रावरूनही त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
मंडपेश्वर शाळेच्या जागेवरून प्रशासनाला सवाल
मंडपेश्वर इथल्या शाळेच्या जागेचा बिल्डरकडून वापर केला जात असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला. काल आपण या ठिकाणी भेट दिली असता परिस्थिती पाहायला मिळाली. शाळेतील मुलांना जाण्यासाठी असलेला रस्ताही बिल्डरच्या वापरासाठी खुला असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण भेट दिल्यानंतर अवघ्या पाच तासांत संबंधित परिसर चकाचक करण्यात आला. मात्र, अनेक महिन्यांपासून या जागेचा वापर होत असताना संबंधितांवर काय कारवाई करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महापालिकेचे डीएमसी अधिकारी या ठिकाणी पाहणी करत नाहीत का? स्थानिक लोकप्रतिनिधी आणि खासदारांचंही याकडे लक्ष नाही का? असा प्रश्न त्यांनी विचारला. केवळ नावापुरती झाडं लावून प्लॉट दाखवणं आणि प्रत्यक्षात जागेचा वेगळाच वापर करणं हा अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेला भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘ठाकरेंनी काय केलं आणि महायुतीने काय केलं, हे जनतेला कळू द्या’
मुंबईच्या विकासकामांवरून किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. गेल्या चार वर्षांतील कामकाजाचा हिशेब जनतेसमोर मांडण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली. 17 ते 22 आणि 22 ते 26 या कालावधीतील कामांचा तपशील समोर आणावा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काय केलं आणि महायुती सरकारने काय केलं, हे मुंबईकरांना समजलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. आम्ही यापूर्वीही श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली होती. आता तरी प्रशासनाने सर्व तारखांसह कामांचा तपशील जाहीर करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
एसआरएच्या पत्राला उत्तर का नाही?
एसआरएच्या मुद्द्यावरही पेडणेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. नगरविकास खात्याअंतर्गत येणाऱ्या या विषयावर संबंधितांनी उत्तर द्यायला हवं. आयुक्त अश्विनी भिडे चांगलं काम करत असतील, तर एसआरएच्या पत्राला उत्तर का दिलं जात नाही? असा सवाल त्यांनी केला. अश्विनी भिडे यांचं नाव घेतलं जात असेल, तर त्यांच्या भूमिकेलाही गांभीर्याने घेतलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या.
रस्ते धुण्यासाठी 233 टँकरचा प्लॅन चुकीचा
मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने आखलेल्या रस्ते धुण्याच्या नियोजनावर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. शहरातील 713 ते 714 रस्ते धुण्यासाठी 233 टँकर वापरण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं त्या म्हणाल्या. यासाठी विहिरींचं पाणी वापरणार असल्याचं प्रशासन सांगत आहे. मात्र, मुंबईत पाण्याची उपलब्धता किती आहे, याचाही विचार व्हायला हवा. पुणे आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मुंबईवरही अशी परिस्थिती येऊ देऊ नका, असा इशारा त्यांनी दिला. प्रदूषण म्हणजे केवळ रस्त्यांवरील धूळ नाही. त्यासाठी व्यापक उपाययोजना आवश्यक आहेत. टँकरवाल्यांची चांदी करण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न असेल, तर त्याला आमचा विरोध असेल, असं पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.
हॉटेलच्या धुरांड्यांवर कारवाई कधी?
सामान्य नागरिकांनी शेकोटी पेटवली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मग मोठ्या हॉटेलमधून निघणाऱ्या धुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय कारवाई करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नियम सर्वांसाठी समान असायला हवेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी देवेन भारती यांच्या संदर्भातही त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
कुर्ल्यातील प्रमोद महाजन उद्यानातील मारहाणीच्या घटनेवर काय म्हणाल्या?
कुर्ल्यातील प्रमोद महाजन उद्यानात घडलेल्या मारहाणीच्या घटनेवर किशोरी पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. साताऱ्यातून आलेल्या एका तरुणासह मित्रमैत्रिणी उद्यानात बसले असताना त्यांना मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हे प्रकरण तितकं साधं नसून, लहान मुलंही मारहाण करण्यासाठी पुढे येत असल्याचं त्या म्हणाल्या. उद्यानात सुरक्षारक्षक काय करत होते? पोलिसांची गस्त का नव्हती? बिट मार्शलप्रमाणे पोलिस फिरताना का दिसले नाहीत? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. पोलिसांचा धाक राहिला आहे का आणि अशा प्रकारचे व्यवहार नेमके कुठून सुरू आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. मी या घटनेला हिंदू-मुस्लिम रंग देणार नाही. प्रत्येक नागरिक सुरक्षित राहिला पाहिजे. राज्यात सध्या जे काही घडत आहे, ते अत्यंत चुकीचं आणि चिंताजनक आहे, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.
