गोरेगावमधील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास, सामान्यांसाठी 33,000 गाळे उपलब्ध होणार

मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास केल्यावर पुनर्वसन घटकाव्यतिरिक्त साधारणपणे 33,000 गाळे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होवू शकतील. त्यामुळे यास “विशेष प्रकल्पाचा दर्जा” देण्याचा निर्णय घेण्यात आला.  

गोरेगावमधील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास, सामान्यांसाठी 33,000 गाळे उपलब्ध होणार
UDDHAV THACKERAY JITENDRA AWHAD

मुंबई : गोरेगावमधील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास आज (8 सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास केल्यावर पुनर्वसन घटकाव्यतिरिक्त साधारणपणे 33,000 गाळे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होवू शकतील. त्यामुळे यास “विशेष प्रकल्पाचा दर्जा” देण्याचा निर्णय घेण्यात आला. (maharashtra cm uddhav thackeray and cabinet meeting government will redevelop MHADA colonies of Goregaon 33000 plots will be available for common people)

मोतीलाल नगरात पुनर्विकासास मुबलक जागा उपलब्ध

म्हाडाच्या गोरेगाव (प.) येथील मोतीलाल नगर 1, 2 व 3 येथे सुमारे 50 हेक्टर ऐवढ्या जागेवर गाळ्यांची अंदाजीत संख्या 3700 व झोपड्यांची संख्या अंदाजे 1600 अशी एकत्रित 5300 इतकी आहे. मोतीलाल नगर वसलेल्या जागेचे एकूण क्षेत्रफळ लक्षात घेता, गाळ्यांची घनता 106 गाळे प्रति हेक्टर आहे. ही घनता बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 च्या विनियम 30 (बी) नुसार 450 गाळे प्रति हेक्टरपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तेथे पुनर्विकासास मुबलक जागा उपलब्ध आहे. शिवाय, सध्या तेथे अस्तित्वात असलेल्या रहिवाशांना त्यांनी धारण केलेल्या गाळ्यांच्या क्षेत्रफळापेक्षा मुबलक मोकळी जागा वापरण्यास उपलब्ध आहे, या सर्व गोष्टींवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

प्रकल्पास  विशेष प्रकल्पाचा दर्जा  देण्याचा निर्णय

गोरेगावमधील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यासाठी अधिकचे बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करावयाचे असल्याने, तसेच हा पुनर्विकास प्रकल्प कंन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी ची नेमणूक करून करावयाचा असल्याने या प्रकल्पास  विशेष प्रकल्पाचा दर्जा  देण्याचा निर्णय झाला.

ही नेमणूक करताना चटई क्षेत्र निर्देशांकाची हिस्सा विभागणी तत्वानुसार करण्यात यावी व त्यासाठी आवश्यक ती निविदा प्रक्रिया म्हाडामार्फत राबविण्यात येईल. या प्रकल्पासाठी निविदा अंतिम करताना पुनर्वसन हिस्सा वगळून उर्वरित शिल्लक चटई क्षेत्रफळापैकी जास्तीत जास्त हिस्सा म्हाडास उपलब्ध करुन देणाऱ्या एजन्सीची निविदा अंतिम करण्यात येईल. मात्र, निविदेतील देकारानुसार म्हाडास मिळणारे बांधिव क्षेत्रामध्ये सवलत देणे अथवा त्याऐवजी अधिमूल्याचा पर्याय स्वीकारला असल्यास अधिमूल्यामध्ये सवलत देण्याबाबत नेमकी स्थिती याबाबत निविदा अंतिम करण्यापूर्वी शासनाची पूर्वमान्यता घेण्यात येईल.

प्रतीगाळा 1600 चौ.फू. बांधकाम क्षेत्रफळ (BUA) मंजूर करण्यात येईल

या प्रकल्पांतर्गत निवासी वापराकरीता प्रतीगाळा 1600 चौ.फू. बांधकाम क्षेत्रफळ (BUA) मंजूर करण्यात येईल. मात्र, या 1600 चौ.फू. बांधकाम क्षेत्रफळापैकी विनियम 33(5) च्या तरतुदींनुसार अनुज्ञेय असलेल्या 833.80 चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळासाठी येणारा बांधकाम खर्च या पुनर्विकास प्रकल्पासाठीच्या एजन्सीला करावा लागेल. अनिवासी वापराकरीता प्रतीगाळा 987 चौ.फु. इतके बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करण्यात येईल या 987 चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापैकी वि.नि.व प्रो.नि. 2034  मधील विनियम 33(5) च्या तरतुदींनुसार अनुज्ञेय असलेल्या 502.73 चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळासाठी येणारा बांधकाम खर्च या पुनर्विकास प्रकल्पासाठीच्या संस्थेने करावा.

अप्रत्यक्षपणे म्हाडाला प्रकल्प राबवावा लागणार

उच्च न्यायालयाच्या दि.17.10.2013 रोजीच्या आदेशानुसार हा प्रकल्प म्हाडा स्वत: पूर्ण करणार आहे. तथापि, म्हाडाला हा प्रकल्प राबविणे सद्यपरिस्थितीत शक्य नसल्याने एजन्सीची नियुक्ती करुन अप्रत्यक्षपणे म्हाडाला प्रकल्प राबवावा लागणार आहे. त्याकरिता काही अटींसह म्हाडातर्फे कच्ची पूर्व तयारी म्हणून करण्याकरिता पावले उचलली जाणार आहेत. त्यासाठी देखील आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

इतर बातम्या :

बारा बलुतेदार समाज घटकाला न्याय मिळवून देणार, नाना पटोलेंची ग्वाही

बेळगावबाबत संजय राऊतांच्या भाजपकडे 3 अपेक्षा, आता भाजपकडून राऊतांना 5 प्रश्न!

सहा वर्षांची मुलगी गायब, शेजारच्या तरुणाच्या घरातील कोपऱ्यात माती कशी? शाहनिशासाठी खोदलं, चिमुकलीचा मृतदेह हाती, प्रचंड गदारोळ

(maharashtra cm uddhav thackeray and cabinet meeting government will redevelop MHADA colonies of Goregaon 33000 plots will be available for common people)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI