शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर, पुढील शैक्षणिक वर्ष 14 जून पासून सुरू

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शनिवार  1 मे, 2021 पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. summer vacation primary and secondary schools

शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर, पुढील शैक्षणिक वर्ष 14 जून पासून सुरू
शाळा

मुंबई: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शनिवार  1 मे, 2021 पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.  या सुट्टीचा कालावधी 13 जून 2021 पर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाच्यावतीनं देण्यात आली आहे. (Maharashtra Education Department declared summer vacation for primary and secondary schools till 13 June)

शाळा 14 जूनला सुरु

पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये सोमवार 14 जून 2021 रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तर,  जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार 28 जून 2021 रोजी शाळा सुरू होतील. या संदर्भात शिक्षण संचालकांकडून नुकतेच सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळयाची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्यांबाबत या सूचना जिल्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकिय अशासकिय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना देण्यात आल्या आहेत.

वार्षिक सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा कमी ठेवा

शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक /माध्यमिक) यांच्या परवानगीने देण्यात येते.माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुटटया 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

वेळोवेळी नवे आदेश देणार

सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महानगरपालीका, सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय हे सध्या बंद आहेत. सबब सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत कोवीड 19 च्या प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थती विचारात घेवून शासन स्तरावरून वेळोवेळी जे आदेश निर्गमित होतील ते यथावकाश संचालनालयाकडून निर्गमित करण्यात येतील. असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे.


संबंधित बातम्या:

लसींचा तुटवडा संपणार, रशियाची स्पुतनिक वी लसीची पहिली खेप भारतात दाखल

बारावीची परीक्षा होणारच, मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय ठरलं?

(Maharashtra Education Department declared summer vacation for primary and secondary schools till 13 June)