VIDEO: अनिल देशमुखांचं ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी ट्विट; थेट परमबीर सिंगांवर साधला निशाणा

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज अखेर ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ईडीसमोर हजर होण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करत आपली बाजू मांडली. (Maharashtra Ex Home Minister Appears For Questioning After Skipping Summons)

VIDEO: अनिल देशमुखांचं ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी ट्विट; थेट परमबीर सिंगांवर साधला निशाणा
Anil Deshmukh


मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज अखेर ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ईडीसमोर हजर होण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करत आपली बाजू मांडली. मात्र, ही बाजू मांडताना त्यांनी थेट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग नेमके आहेत कुठे? असा सवालच अनिल देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी आज दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यात त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले ते सिंग आज कुठे आहेत? ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार परमबीर सिंग भारत सोडून पळून गेले असल्याचं समजत आहे. ज्याने आमच्यावर आरोप केला तोच पळून गेला. आज सिंग यांच्या विरोधात त्यांच्याच खात्यातील अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या . अनेक व्यावसायिकांनीही तक्रारी केल्या आहेत. अशा माणसाच्या तक्रारीवरून माझी चौकशी होत आहे, याचं दु:ख आहे, असं देशमुख म्हणाले.

30 वर्षात एकही आरोप झाला नाही

तसेच परमबीर सिंग यांचा सहकारी सचिन वाझेनेही सिंग यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. आज सचिन वाझे हे खुनाच्या आरोपावरून आतमध्ये आहेत. सचिन वाझे यापूर्वी सुद्धा अनेकदा तुरुंगात होते. मी गृहमंत्री असताना सचिन वाझेंना नोकरीतून काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यांना नोकरीतून काढल्यावर त्यांनी माझ्यावर आरोप केले. परमबीर सिंग आणि वाझेंच्या आरोपावर माझी चौकशी होत आहे. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. त्याचं मला दु:ख होत आहे. मी सरळमार्गाने चालणारा आणि नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती आहे. 30 वर्षात माझ्यावर एकही आरोप झाला नाही. राजकीय आणि सामाजिक जीवनात एकदाही आरोप झाला नाही. पण आज सिंग देश सोडून पळू गेले, वाझे तुरुंगात आहेत, या लोकांनीच माझ्यावर केलेल्या आरोपाची ईडी आणि सीबीआय चौकशी करत आहे. याचं मला अतिशय दु:ख आहे, अशी सल त्यांनी बोलून दाखवली.

ईडी, सीबीआयला सहकार्य केलं

मला जेव्हा ईडीचा समन्स आला. तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही अशा चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मला जेव्हा जेव्हा समन्स आला तेव्हा मी ईडीला माझी याचिका कोर्टात आहे. त्याची सुनावणी सुरू आहे असं सांगितलं. मी सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यावर मी स्वत: ईडीच्या कार्यालयात येईल असं सांगितलं होतं. आमच्या सर्व घरावर छापे मारले. आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं. सीबीआयने दोनदा समन्स दिलं. दोनदा मी त्यांच्या कार्यालायत जाऊन स्टेटमेटं दिलं आहे. आज मी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर झालो आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

म्हणून ईडी कार्यालयात जाणार आहे

उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जात आहे. चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

अखेर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात दाखल, कसून चौकशी होणार?

देवेंद्र फडणवीसांवर मलिकांचा गंभीर आरोप, पंकजा मुंडे म्हणतात, ‘हे अत्यंत हास्यास्पद’

दिवाळीपूर्वीचं फटाका फोडतोय, अजित पवार आणि पवारांच्या जावयांच्या कंपन्यात 1050 कोटी आले, किरीट सोमय्यांचा आरोप

(Maharashtra Ex Home Minister Appears For Questioning After Skipping Summons)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI