सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खलबतं; मविआ सरकार सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात दंड थोपटणार?

मुंबईतील शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर हालचालींना वेग आला आहे. | Anil deshmukh CBI NCP

सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खलबतं; मविआ सरकार सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात दंड थोपटणार?
शरद पवार, अनिल देशमुख, उद्धव ठाकरे

मुंबई: परमबीर सिंह यांच्या पत्रातील आरोपासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात महाविकासआघाडी आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडून दंड थोपण्यात येणार आहेत. या निर्णयाविरोधात राज्य सरकार आणि अनिल देशमुख स्वतंत्रपणे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करतील, अशी माहिती समोर येत आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी हे महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणार असल्याचे सांगितले जाते. (Mahavikas Agahdi govt may appeal in SC court against HC decision on CBI probe in Parambir singh letter case)

या पार्श्वभूमीवर मुंबईतील शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर हालचालींना वेग आला आहे. काहीवेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार याठिकाणी दाखल झाले होते. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील सिल्व्हर ओकवर दाखल होत आहेत. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होऊन सर्वोच्च न्यायालयात जायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

सीबीआयची चौकशी टाळण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीत; ‘या’ बड्या वकिलाची भेट

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी व्हावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी सीबीआयची चौकशी टाळण्यासाठी धावाधाव सुरु केली आहे. अनिल देशमुख यांच्याकडून सीबीआय चौकशीच्या (CBI) निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची दाट शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी सोमवारी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तातडीने दिल्ली गाठली. याठिकाणी त्यांनी काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. अनिल देशमुख हे सिंघवी यांच्या घरी गेले होते. याठिकाणी अनिल देशमुख, अभिषेक मनु सिंघवी आणि वकिलांच्या एका टीममध्ये साधारण तासभर चर्चा सुरु होती. त्यामुळे अनिल देशमुख सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार, असल्याचे सांगितले जाते.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयच्या वेगवान हालचाली

मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या पत्रासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. न्यायालयाने सीबीआयला अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांचीच मुदत दिली आहे. त्यामुळे सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे पथक आजच मुंबईत दाखल होईल.

मुंबईत आल्यानंतर सीबीआयच्या पथकाकडून सर्वप्रथम मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना चौकशीला बोलावले जाण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांनी यापूर्वीच आपल्याकडे आणखी पुरावे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता ते सीबीआयकडे अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कोणती माहिती देणार, हे पाहावे लागेल.

परमबीर सिंह यांच्या चौकशीनंतर सीबीआय आपला मोर्चा साहजिकच अनिल देशमुख यांच्याकडे वळवेल. सीबीआयकडून अद्याप मुंबईतील चौकशीचे ठिकाणही गुप्त ठेवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

अनिल देशमुखप्रकरणात पहिल्यांदाच शरद पवारांचं नाव, अॅड. जयश्री पाटील म्हणाल्या, भलेही तुम्ही मोठे मराठा नेते असाल

(Mahavikas Agahdi govt may appeal in SC court against HC decision on CBI probe in Parambir singh letter case)

Published On - 10:18 am, Tue, 6 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI