धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला?; अंजली दमानिया यांचं सूचक विधान काय?
Anjali Damania on Dhananjay Munde Resign : गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून बीड राज्यातच नाही तर देशात गाजत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुंडगिरी, दहशत, टोळी युद्ध, घोटाळे, भ्रष्टाचार, यामुळे हा जिल्हा बदनाम झाला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अडीच महिने उलटली आहेत. याप्रकरणात कारवाईचा केवळ फार्स होत असल्याचा सातत्याने आरोप होत आहे. वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट, कृष्णा अंधारे फरार, तर इतर आरोपींना वाचवण्यासाठी अजूनही तपासाला हातच घातला नसल्याच्या आरोपांनी तपास यंत्रणा पण संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांचे आणि वाल्मिक कराडचे जवळचे संबंध उघड झालेले असतानाही त्यांचा राजीनामा न घेतल्याने सरकार सुद्धा संशयाच्या वादळात अडकले आहेत. त्यातच याप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
धसांची विश्वासहर्ता संपली
सुरेश धस यांच्या बद्दल आता काही बोलायचं नाही त्यांची विश्वासहर्ता संपली आहे, असे वक्तव्य दमानिया यांनी केले आहे. त्यांच्यावर टिपणी करणे मला योग्य वाटत नाही, असे त्या म्हणाल्या. तर त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना सुद्धा आरसा दाखवला आहे. ते अतिशय विद्वान व्यक्ती असल्याचा खोचक टोला दमानिया यांनी त्यांना लगावला. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. भेट झाली हे चांगलं आहे, पण त्याचा काहीच परिणाम खाली दिसत नसल्याच्या त्या म्हणाल्या.




आरोपींचा डेटा मिळायाला अडीच महिने?
आजपर्यंत ज्या ज्या गोष्टीची मागणी करण्यात येत आहे, त्यात 9 डिसेंबर रोजी सापडलेल्या दोन मोबाईलचा डेटा अजूनही आलेला नाही. सी.डी.आर मिळाला नाही. डेटा रिकव्हरी करायला अडीच महिने लागले, तरी काहीच हाती नाही. आणखी किती वेळ लागणार आहे, असा सवाल त्यांनी केला. 19 जूनला सातपुडा बंगल्यामध्ये अशी बैठक झाली. त्या संदर्भात काही कारवाई का नाही झाली, असा खडा सवाल त्यांनी केला. आजही सगळे प्रश्न अनुत्तरीत आहेत, असे त्या म्हणाल्या.
आमरण उपोषण नको, धडा शिकवा
महादेव मुंडे यांच्या पत्नी आंदोलन करणार आहेत. त्या आमरण उपोषण करणार आहेत. त्यावर दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली. असं अमरण उपोषण करून काय फायदा या लोकांना आपण धडे शिकवले पाहिजे. आमरण उपोषण करून काही नाही होणार..हा विषय धरून आपण लढलो पाहिजे. कुठलंच सरकार किंवा राजकारणी त्यांना कुठलीही भावना नाही. जीव तोडून लढलात, भिंतीवर डोकं जरी आपटलं तरी त्यांच्या पोटाचे पाणी हलणार नाही, अशी बोचरी टीका त्यांनी यंत्रणा आणि सरकारवर केली.
धनंजय मुंडे अनुपस्थित, राजीनामा दिला की काय?
आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बैठक झाली. त्या बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित असल्याबाबत त्यांनी चिमटा काढला. हा अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा आहे. आज पण जर ते कॅबिनेटला अनुपस्थित असतील. याचा अर्थ त्यांनी राजीनामा कुठे दिला आहे की काय असा प्रश्न पडतो, असा टोला त्यांनी लगावला.
मागच्या वेळेस सांगण्यात आलं की डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्यामुळे मुंडे बैठकीला आले नाहीत. मात्र आज जर अनुपस्थित असतील तर त्याचं कारण काय हे अजित पवारांनी देखील सांगावं. त्यांचा राजीनामा घेतला आहे की काय आणि घेतला असेल तर आनंदच आहे, असा टोला दमानिया यांनी लगावला.