तिहेरी तलाक विरोधात देशातील पहिला गुन्हा मुंब्य्रात, MBA महिलेची तक्रार

  • गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, ठाणे
  • Published On - 16:39 PM, 2 Aug 2019
तिहेरी तलाक विरोधात देशातील पहिला गुन्हा मुंब्य्रात, MBA महिलेची तक्रार

मुंब्रा : तिहेरी तलाक कायदा (Triple talaq bill) संमत झाल्यानंतर देशातील पहिला गुन्हा ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये दाखल करण्यात आला आहे. पतीने व्हॉट्सअॅपवरुन तीन तलाक दिल्याची तक्रार एका उच्चशिक्षित महिलेने दिली आहे.

ठाण्यातील कौसा मुंब्रा भागात राहणाऱ्या महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 वर्षीय पती इम्तियाज गुलाम पटेलविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पतीचा दुसरा निकाह

पतीने व्हॉट्सअॅपवरुन गेल्या वर्षी आपल्याला तीन वेळा तलाक दिला, असा आरोप तिने केला आहे. तलाक देऊन गेल्या वर्षी दुसऱ्या महिलेसोबत लग्न केल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. त्याशिवाय हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रारही तिने केली आहे.

मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा कलम 4 सोबत, भादंवि 498 अ, 406, 34 अंतर्गत हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

तक्रारदार महिलेने एमबीएपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असून तिला सहा महिन्यांचा मुलगा आहे. पतीसोबत सासू आणि नणंद यांच्याविरोधातही तिने तक्रार केली आहे.

तिहेरी तलाक कायद्यानुसार तीन वर्ष शिक्षेची तरतूद आहे. आरोपीविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

या देशातही तिहेरी तलाकला बंदी

तिहेरी तलाकला अनेक मुस्लीम देशांमध्येही बंदी आहे. ट्युनिशिया, अल्जेरिया, मलेशिया, जॉर्डन, इजिप्त, इराण, इराक, ब्रुनेई, यूएई, इंडोनेशिया, लिबिया, सुदान, लेबनन, सौदी अरेबिया, मोरक्को आणि कुवैत या देशांमध्ये तिहेरी तलाक अवैध आहे.