जेजुरीनंतर मिशन औंढा नागनाथ, ‘आम्हीच पुतळ्याचे अनावरण करणार’; शरद पवारांनंतर पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

16 मार्चला औंढा नागनाथ येथील आहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचं पडळकर यांनी म्हटलंय. ( gopichand padalkar ahilyabai holkar uddhav thackeray)

  • राहुल झोरी
  • Published On - 8:03 AM, 7 Mar 2021
जेजुरीनंतर मिशन औंढा नागनाथ, 'आम्हीच पुतळ्याचे अनावरण करणार'; शरद पवारांनंतर पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
गोपीचंद पडळकर आणि उद्धव ठाकरे

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी जेजुरी येथील आहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या पुतळ्याचे मेंढपाळाच्या हस्ते अनावरण केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर आता पडळकर यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले असून येत्या 16 मार्चला औंढा नागनाथ (Aundha Nagnath) येथील आहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पडळकर यांनी ही घोषणा केल्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच आव्हान दिल्याचं म्हटलं जात आहे. (MLA Gopichand Padalkar will uncover the statue of Ahilyabai Holkar in Aundha Nagnath criticizes Uddhav Thackeray)

“येत्या 16 मार्चला औंढा नागनाथ येथील आहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण आम्ही करणार आहोत. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांना यासाठी वेळ नाही. माझं कुटुंब माझी जबाबदार यातून मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. त्यामुळे सर्व समाजाच्या वतीने येत्या 16 तारखेला औंढा नागनाथ येथील आहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहोत,” असे पडळकर यांनी म्हटलंय.

पडळकरांकडून थेट कार्यक्रमपत्रिका जाहीर

पडळकर यांनी ही घोषणा करताना या संदर्भातील कार्यक्रमपत्रिका जाहीर केली आहे. यावेळी कार्यक्रमपत्रिका जाहीर करत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना आहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी वेळ नसल्याचा आरोप केलाय. राज्यातल्या मेंढपाळ बांधवांच्या हस्ते औंढा नागनाथ येथील पुतळ्याचे अनावरण करणार आहोत, असंही पडळकर यांनी यावेळी सांगितलं.

यापूर्वी जेजुरी येथे पुतळ्याचे अनावरण

याआधी पडळकर यांनी फेब्रुवारी महिन्यात जेजुरी येथील आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे सकाळी साडे पाच वाजता एका मेंढपाळाच्या हस्ते अनावरण केले होते. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, त्याआधीच पडळकर यांनी जेजुरी येथील पुतळ्याचे अनावरण केले होते. या प्रकारानंतर राज्यात मोठा वाद झाला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पडळकर यांच्यावर सडोतोड टीका केली होती. याच मुद्द्यावरुन ‘टीव्ही 9 मराठी’वर बोलताना पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलाच वाद झाला होता. त्यानंतर पडळकर यांनी आता औंढा नागनाथ येथील पुतळ्याचे अनावरण करण्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान पडळकर यांच्या या घोषणेने राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही असा आरोप केल्यामुळे ही घोषणा म्हणजे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आव्हान असल्याचे म्हटले जात आहे. पडळकर यांनी शरद पवार यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल्यानंतर आगामी काळात काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

पडळकरांनी केलेला प्रकार हास्यास्पद आणि केविलपणा, जयंत पाटलांची सडकून टीका