Raj Thackeray | राज ठाकरे यांच्या घरी खलबतं, ‘टोलमुक्त महाराष्ट्र’वर चर्चा काय?
राज ठाकरेंची टोलमुक्तीच्या विषयावरुन मंत्री दादा भूसेंसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर, टोलमुक्ती हा विषय नाही, तर सोयीसुविधांची अंमलबजावणी होणार, असं राज ठाकरे म्हणाले. या बैठकीत काय-काय ठरलं या विषयाची माहिती समोर आलीय.

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : रोड टॅक्स द्यायचा मग तरी टोल का भरायचा? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा होता. मात्र राज्य चालवायला पैसे लागतात. त्यामुळे टोलमुक्तीचा प्रश्न नाही, असं आता राज ठाकरेंचं म्हणणं आहे. महिन्याला टोलमधून राजकारण्यांकडे पैसे जातात. त्यामुळे टोलबंद होणार नसून हा धंदा असल्याचा आरोप राज ठाकरेंनीच केला होता. मात्र, मंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर राज ठाकरेंनी 2026 पर्यंतच्या कराराची माहिती दिलीय. आपण ही प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याच वक्तव्यामुळे दिल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. सर्वच टोलनाक्यावर कारसह छोट्या वाहनांना टोलमुक्ती या वक्तव्यामुळं चलबिचल झाल्याचं राज ठाकरेंचं म्हणणं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी कारसह छोट्या वाहनांना टोलमुक्ती संदर्भात सरकारची बैठक पार पडली. मंत्री दादा भूसे आणि अधिकारी या बैठकीसाठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले. जवळपास अडीच तास बैठक झाली आणि विषय टोलमुक्तीवरुन सोयीसुविधेवर आला. पुढचे 15 दिवस टोलच्या सर्व एंट्री पॉईंट्सवर वाहनांची संख्या मोजली जाणार आहे. वाहनांच्या सर्वेक्षणासाठी सरकार आणि मनसेकडून कॅमेरे लावले जातील. पिवळ्या रेषेच्या पुढे 200 ते 300 मीटरपर्यंत गेलेली वाहनं मोफत सोडली जातील. 4 मिनिटांच्या पुढे टोलनाक्यावर एकही गाडी थांबणार नाही, असं बैठकीत ठरलंय.
ठाण्याच्या आनंदनगर टोलनाक्यावरुन ऐरोली टोलनाक्यावर जायचं असल्यास एकदाच टोल भरावा लागेल. मुलुंडच्या हरीओमनगरमधील रहिवाशांसाठी मुलुंड म्हाडा कॉलनीमधून पूल बांधला जाईल. टोलनाक्यांवर प्रसाधनगृह, प्रथमोपचार सेवा, रुग्णवाहिका, क्रेन या सुविधांची अंमलबजावणी होणार आहे. ठाण्याला झालेली टोलवाढ रद्द करण्याच्या दृष्टीने सरकारला महिन्याभराचा वेळ देण्यात आलाय. टोलनाक्यावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. पीडब्ल्यूडीचे 29 आणि एमएसआरडीचे 15 जुने टोल बंद करण्याचीही मागणी राज ठाकरेंनी केली.
शरद पवारांची टीका
टोलच्या मोबदल्यात ज्या सुविधा आवश्यक आहेत किंवा नियमांची अंमलबजावणी करण्याचा शब्द मंत्री दादा भूसेंनी दिला. मात्र मंत्री आणि सरकारचे अधिकारी बैठकीसाठी राज ठाकरेंच्या घरी येतात, त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी टोला लगावलाय. शरद पवार गांभीर्यानं बोलले. मात्र राज ठाकरेंनी मिश्किलपणे बोलत शासन आपल्या दारी ही सरकारचीच टॅगलाईन असल्याचं म्हटलं.
मुंबई एंट्री पॉईंट्सच्या टोलनाक्यावर जी 5 रुपयांची वाढ झाली, त्या 5 रुपयांच्या अवतीभवती आंदोलन झालं का? अशी टीका गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंवर केलीय. राज ठाकरेंनी ज्या पद्धतीनं टोलचा विषय हाती घेतला होता, त्यावरुन छोट्या वाहनांना टोलमाफी होईल किंवा सरकारला भाग पाडलं जाईल अशी चर्चा होती. मात्र टोल सुरुच राहिल, हे फायनल झालंय.
