मनसे यंदा 100 टक्के महापालिका…; राज ठाकरेंचे मोठे विधान, ठाकरेंसोबत हात मिळवणी करण्याबद्दल थेट बोलले
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकां पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. मराठी भाषेचा प्रचार करण्याचे आवाहन करताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नये असा सल्ला त्यांनी दिला.

आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर येऊ ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे जोरदार तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी निवडणुकांची तयारी केली जात आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात जोरदार घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबद्दल मोठे विधान केले. यासोबतच त्यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
राज ठाकरे यांनी नुकतंच मुंबईतील रंगशारदा या ठिकाणी एक पदाधिकारी मेळावा घेतला. या मेळाव्याला मुंबईतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यादरम्यान राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. मराठी भाषेचा मुद्दा प्रत्येक घराघरात पोहोचवा, पण हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका, असा महत्त्वाचा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.
प्रत्येक मराठी बांधवांपर्यंत मराठी पोहोचवणं गरजेचे
या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईतील राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकांवर चर्चा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मराठी भाषेसाठी मनसेने घेतलेली भूमिका प्रत्येक मराठी बांधवांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. पण हे काम करताना कोणाचाही द्वेष करण्याची गरज नाही. हिंदी भाषिकांचा द्वेष न करता, आपल्या मराठी अस्मितेचा मुद्दा सकारात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडा.” असे राज ठाकरे म्हणाले.
हेवेदावे संपवून निवडणुकीच्या कामाला लागा
त्यासोबतच राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आतापासूनच मुंबईतील आपल्या वॉर्डमध्ये मनपा निवडणुकीसाठी कामाला लागावे असे आवाहन केले. स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करा, तसेच ग्राउंडवर उतरून काम करण्याचे निर्देश राज ठाकरेंनी केले आहेत. कोणत्याही दबावाला बळी न पडता, पूर्ण आत्मविश्वासाने काम करा. पक्षामध्ये अंतर्गत हेवेदावे आणि गटबाजीला थारा देऊ नका. ज्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील, त्यांना स्वीकारून एकत्र काम करा. आपापसातले हेवेदावे संपवून निवडणुकीच्या कामाला लागा,” असे स्पष्ट निर्देश राज ठाकरेंनी दिले.
यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटासोबतच्या संभाव्य युतीबद्दलही भाष्य केले. “ठाकरेंच्या शिवसेनेसोबत काय करायचं ते माझ्यावर सोडा. मी युतीबाबत योग्यवेळी बोलेन, माझ्या आदेशाची वाट पाहा” असे राज ठाकरेंनी सांगितले. तसेच “यंदा मनसे १०० टक्के महापालिका निवडणुकीत सत्तेवर येणार”, असेही राज ठाकरेंनी यावेळी म्हटले.
