मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना, नातवाने आजीला फेकलं कचऱ्यात; धक्कादायक कारण समोर
मुंबईतील आरे परिसरात एका वृद्ध महिलेला तिच्याच नातवाने कचऱ्यात फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यशोदा गायकवाड या वृद्ध महिलेला त्वचेचा कॅन्सर आहे आणि उपचारांसाठी पैसे नसल्याने नातवाने हे कृत्य केले.

मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुंबईतील एका नातवाने आजीला कचऱ्यात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्वचेचा कॅन्सर असल्याने नातवाने आजीला कचऱ्यात फेकल्याचे माहिती समोर येत आहे. सध्या वृद्ध महिलेवर कुपर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील आरे परिसरात एक वृद्ध महिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या वृद्ध महिलेची चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. यशोदा गायकवाड असे या महिलेचे नाव आहे. त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वत:च्याच आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून तो निघून गेला होता. यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आजीला त्वचेचा कॅन्सर असल्याने आणि उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याने त्याने या वृद्ध महिलेला फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दोन रुग्णालयाकडून तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी कूपर रुग्णालयाला विनंती केली. सध्या तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या वृद्ध महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता तिने मालाडमधील एका घराचा पत्ता पोलिसांना दिला. पोलिसांनी त्या पत्त्यावर जाऊन शोधाशोध केली असता तिथे कुलूप असल्याचे समोर आले. सध्या पोलीस त्या नातवाचा आणि कुटुंबाचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
या अमानवी कृत्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे नात्यांमधील विश्वासाला तडा गेला असून, माणुसकी किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, याचा प्रत्यय आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
