मुंबईतील गणपती विसर्जनाला गालबोट, मिरवणुकीतील ट्रॉलीला शॉक लागून मोठी दुर्घटना, पाच जण गंभीर
राज्यात गणपती विसर्जनाचा उत्साह असतानाच मुंबईत साकीनाका येथे विसर्जन मिरवणुकीत झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. हाई टेंशन वायरचा झटका लागल्याने ही घटना घडली. तर विरारमध्ये खाडीत बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यात आले. या घटनांनी गणेशोत्सवावर गालबोट लावले आहे.

राज्यात सर्वत्र गणपती विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. एकीकडे आनंद आणि उत्साहमय वातावरण असताना दुसरीकडे मात्र मुंबईच्या साकीनाका आणि विरारमध्ये दोन वेगवेगळ्या दुर्घटनांनी या उत्सवाला गालबोट लागले आहे. मुंबईतील साकीनाका परिसरातील एका विसर्जन मिरवणुकीत हाय टेन्शन वायरमधून शॉक लागल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे विरारमध्ये खाडीत बुडणाऱ्या तीन भाविकांना वाचवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. या दोन्ही घटनांमुळे गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे.
साकीनाक्यात एकाचा मृत्यू
मुंबईच्या साकीनाका परिसरातील खैराणी रोडवरील एका विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्दैवी घटना घडली. श्री गजानन मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू असताना त्यांच्या ट्रॉलीला लटकलेल्या हाय टेन्शन वायरचा शॉक लागला. यात एकाचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. टाटा पॉवर कंपनीची ११ हजार व्होल्टेजची वायर मिरवणुकीच्या ट्रॉलीला लागली. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोललं जात आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या साकीनाका खैराणी रोड परिसरातून श्री गजानन मित्र मंडळाची गणेश विसर्जनाची ट्रॉली मिरवणुकीतून जात होती. त्या रस्त्यावर टाटा पॉवर कंपनीची 11 हजार व्होल्टेजची हाय टेन्शन वायर जाते. त्या वायरमधील एक छोटी वायर खाली लटकत होती. विसर्जन मिरवणूक सुरु असताना ही वायर थेट गणपतीची ट्रॉलीला स्पर्श झाली. यानंतर अवघ्या काही सेकंदात या ट्रॉलीवर असलेल्या पाच जणांना शॉक बसला. त्यात हे पाच जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी बिनू शिवकुमार (36 वर्षे) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तुषार गुप्ता (१८), धर्मराज गुप्ता (४४), आरुष गुप्ता (१२), शंभू कामी (२०) आणि करण कानोजिया (१४) यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विरारमध्ये खाडीत बुडणाऱ्या तिघांना वाचवले
तर दुसरीकडे गणेश विसर्जनाच्या दिवशी विरारच्या मारंबळपाडा येथे गणेश विसर्जनादरम्यान खाडीत बुडणाऱ्या तीन भाविकांना स्थानिक मच्छीमार आणि रो-रो सेवेच्या कर्मचाऱ्यांनी वाचवले. विरारच्या मारंबळपाडा जेट्टीवर एका कुटुंब आपला घरगुती गणपती विसर्जनासाठी गेले होते. या विसर्जनानिमित्त एका कुटुंबातील तीन सदस्य गणपती विसर्जनासाठी समुद्रात खोलवर गेले होते. पण समुद्राची खोली आणि पाण्याचा वेग लक्षात न आल्याने तिघेही समुद्राच्या खोल पाण्यात वाहत गेले.
ते बुडत असल्याचे लक्षात येताच तेथील सुवर्णदुर्ग रो-रो सेवेचे कर्मचारी तात्काळ फेरीबोट घेऊन त्यांच्या दिशेने धावले. यानंतर स्थानिक मच्छीमार आणि सुवर्णदुर्ग रो-रो सेवेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने स्पीड बोटच्या मदतीने दोघांना वाचवले, तर एका महिलेला मच्छिमारांच्या छोट्या बोटीने वाचवण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठी दुर्घटना टळली.
