Mumbai Local Train Megablock : हार्बर रेल्वेच्या प्रवाशांचे हाल, पनवेल ते मानखुर्द लोकल सेवा बंद, पर्यायी व्यवस्था काय?
Mumbai Local Train Megablock News Saturday and Sunday : मुंबईच्या हार्बर मार्गावर 13-14 सप्टेंबर 2025 रोजी 14 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. कुर्ला आणि टिळक नगर स्टेशनदरम्यान नवीन मार्गिकेच्या कामासाठी हा ब्लॉक आवश्यक आहे. यामुळे वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद आहे.

मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला आणि टिळक नगर स्टेशनदरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी काल रात्रीपासून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक शनिवारी 13 सप्टेंबर, 2025 रात्री 11.05 वाजल्यापासून सुरू होईल. त्यानंतर रविवारी14 सप्टेंबर 2025 दुपारी 1.35 वाजेपर्यंत असेल. हार्बर मार्गावरील सुरु असलेला मेगाब्लॉक हा जवळपास १४ तासांपेक्षा अधिक काळ असणार आहे. या ब्लॉकदरम्यान वडाळा रोड ते मानखुर्ददरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
लोकल सेवांवर मोठा परिणाम
या ब्लॉकमुळे मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. काल रात्री 10.20 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या सर्व डाऊन हार्बर लोकल रद्द कर्यात आला आहे. तसेच पनवेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे रात्री 10.07 पासून सुटणाऱ्या अप हार्बर सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. या मेगाब्लॉक काळात आज दुपारी 1 वाजेपर्यंत लोकल सेवा ठप्प राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! 🚨 14.09.2025 रोजी मध्य रेल्वे, मुंबई विभागात मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हार्बर मार्गावर आधी जाहीर केल्याप्रमाणे कुर्ला-टिळकनगर विभागात ट्राफिक ब्लॉक असेल. ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक राहणार नाही. कृपया वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करा.… pic.twitter.com/mJaxeesMGi
— Central Railway (@Central_Railway) September 13, 2025
रेल्वेकडून पर्यायी व्यवस्था काय?
हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. या ब्लॉकच्या काळात पनवेल ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. तसेच रेल्वेने बेस्ट बस आणि एनएमएमटी बस यांना अतिरिक्त बस सेवा सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासोबतच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी पोलिस आणि तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यासोबतच या ब्लॉक काळात पासधारक प्रवाशांना मेन लाईनवरुन प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
ब्लॉक कधी संपणार?
हा ब्लॉक आज दुपारी १ च्या दरम्यान संपणार आहे. त्यानंतर पनवेलहून सीएसएमटीसाठी जाणारी पहिली लोकल दुपारी 1.09 वाजता सुटेल. तर सीएसएमटीहून पनवेलसाठी जाणारी पहिली लोकल दुपारी 1.30 वाजता सुटेल. या काळात प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. तसेच सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी हे काम आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
