मुंबईत दोन दिवसांचा मेगाब्लॉक, तब्बल 215 लोकल रद्द होणार, पाहा कोणत्या लोकल धावणार आणि कोणत्या रद्द?
बोरिवली आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. यामुळे मंगळवार आणि बुधवारी २१५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवर दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे आज लोकलच्या वेळापत्रकात मोठे बदल पाहायला मिळणार आहे. या काळात अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच काही लोकल या उशिराने धावतील. प्रवाशांनी या वेळेत प्रवास टाळावा किंवा पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. यामुळे पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आठवड्याचे पहिले दोन दिवस कष्टाचे ठरणार आहेत.
मेगाब्लॉकचे कारण काय?
कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ही नवीन मार्गिका अस्तित्वात असलेल्या जलद मार्गाला जोडण्यासाठी आणि तांत्रिक यांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही जलद मार्गांवर तसेच पाचव्या मार्गिकेवरही वाहतूक बंद राहणार आहे. कांदिवली ते बोरिवली दरम्यान सुरू असलेल्या सहाव्या मार्गिकेच्या कामाला वेग देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष तांत्रिक ब्लॉकची घोषणा केली आहे. या मेगाब्लॉकमुळे मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवसांत एकूण २१५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
हा ब्लॉक प्रामुख्याने मध्यरात्रीच्या वेळी असला, तरी त्याचा थेट परिणाम पहाटेच्या आणि सकाळच्या सत्रातील लोकल फेऱ्यांवर होणार आहे. मुंबईतील अप जलद मार्गावर मंगळवारी मध्यरात्री १२:०० ते बुधवारी पहाटे ५:३० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर डाऊन जलद मार्गावर मंगळवारी मध्यरात्री १:०० ते पहाटे ४:३० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत मंगळवारी ९३ फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर बुधवारी १२२ फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसात २१५ फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.
विशेष म्हणजे, रद्द करण्यात आलेल्या फेऱ्यांमध्ये प्रवाशांच्या पसंतीच्या एसी (AC) लोकल आणि १५ डब्यांच्या जलद गाड्यांचाही समावेश आहे. या काळात पाचव्या मार्गिकेवरील वाहतूकही पूर्णपणे बंद राहील, ज्यामुळे नियमित वेळापत्रकावर मोठा परिणाम होऊन गाड्या विलंबाने धावण्याची शक्यता आहे. याचा फटका लोकल प्रवाशांना बसणार आहे.
लोकल प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी मात्र रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. नवीन वर्षातील प्रवाशांची वाढती गर्दी आणि वेटिंग लिस्ट लक्षात घेता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत महत्त्वाच्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत. मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या तेजस राजधानी (१२९५१/५२) गाडीला एक जादा 3AC डबा जोडला आहे, आता ही ट्रेन २२ डब्यांसह धावेल. तसेच साबरमती ते नवी दिल्ली दरम्यानच्या स्वर्ण जयंती राजधानी (१२९५७/५८) या गाडीला एक अतिरिक्त 3AC डबा जोडून ती २३ डब्यांची करण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेस या गाडीलाही अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत.
