
Eknath Shinde-Devendra Fadnavis: मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात मनोमिलन झाले आहे. जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. निकाल जर युतीच्या बाजुने लागला तर भाजपच्या हाती आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या तिजोरीची चाबी येईल. पण शिंदे सेनेच्या पदरात काय पडणार? शिवसेनेचा भगवाही पालिकेवर फडकणार नाही, ना त्यांचा महापौर होईल. म्हणजे भाजपसोबत राहण्याच्या आगतिकतेशिवाय शिंदे सेनेच्या हाती काहीच उरणार नाही, असा राजकीय विश्लेषकांचा सूर आहे. जागा वाटपच्या फॉर्म्युल्यातच मोठा गेम झाला आहे. त्यामुळे पैकीच्या पैकी जागा जरी शिंदे सेनेने मिळवल्या. 100 टक्के स्ट्राईक रेट ठेवला, तरी त्यांच्या या प्रयत्नांना काहीही अर्थ नसेल.कारण महापौर पद त्यांच्या पदरात पडणारच नाही.
भाजप-शिवसेना जागा वाटपाचे सूत्र काय?
मुंबई महापालिकेच्या एकूण 227 प्रभागासाठी यंदा चुरस आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा करून अगोदरच मोठे आव्हान उभं केलं आहे. तिकडं काँग्रेसने रासप आणि वंचितसोबत आघाडीचा डाव मांडला आहे. तर दोन्ही राष्ट्रवादीचं अद्याप तळ्यातमळ्यात सुरू आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी तगडी फाईट आणि वातावरण टाईट असेल. एका एका जागेची निवडणूक प्रतिष्ठेची होईल. खरा सामना शिंदेसेनासह भाजपविरोधी इतर असाच असेल. त्यामुळे सत्तेतील या वाटेकऱ्यांना मुंबईत पहिल्यांदाच सत्ता खेचून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Election 2026) भाजप आणि शिंदे सेनेत जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाल्याचे मानले जात आहे. मुंबईच्या 227 जागांपैकी भाजप 140 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 87 जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीने एकला चलो रे चा नारा दिला आहे. तर काही घटक पक्षांसाठी काही जागा सोडण्यात येतील.
जागा वाटपाच्या फॉर्म्युलातच गेम
आता जागा वाटपाचा हा फॉर्म्युला गृहित धरला तर भाजपच्या वाट्याला 140 जागा आल्या आहेत. तर शिंदे सेना 87 जागा लढवणार आहे. 227 जागा असलेल्या मुंबई महापालिकेत बहुमतासाठी 114 हा जादुई आकडा मिळवावा लागेल. जागा वाटपात भाजप हा मोठा पक्ष आहे हे मान्य झाले आहे. त्यामुळे शिंदे सेनेने पैकीच्या पैकी जागा जरी मिळवल्या तरी महापौर हा भाजपचाच होणार हे नक्की आहे. महायुतीचा महापौर होणार हे तर मनाला समाधान देणारं वाक्य ठरणार आहे, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. त्यामुळे शिंदे सेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत महापौर पद मिळणार नाही हे स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे या तडजोडीचा ठाण्यात आणि नवी मुंबईत फायदा होणार का? हे आठवडाभरात समोर येईल.