Maharashtra Politics: महाराष्ट्रात आता दोन नाही तीन आघाड्या? मुंबई, पुणे ठरणार सत्ता बदलाचे केंद्र?
Maharashtra Politics: राज्यात महापालिका आणि मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय आघाड्यांचे प्रयोग सुरू झाले आहे. त्यात दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव सेना आणि मनसेची भूमिका निर्णयाक ठरू शकते.

Municipal Corporation Election: राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका वेगळं राजकीय धक्कातंत्र आणतील का? अशी चर्चा रंगली आहे. राजकीय वेगळ्या प्रयोगाचे मुंबईपाठोपाठ पुणे हे केंद्र ठरू पाहत आहे. मुंबईत पहिला प्रयोग हाऊसफुल्ल होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यापासून कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. त्याचे अंडरकरंट लवकरच दोन्ही निवडणुकीतून दिसून येईल. तर दुसरीकडे पुण्यातही दुसर्या प्रयोगाला सुरुवात झाली आहे. हा प्रयोग केवळ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यापूरता मर्यादीत नाही. तर काँग्रेस, उद्धव सेना आणि मनसे यांच्या एकत्रिकरणाची पण एक नांदी आहे. या सर्व घाडमोडी नाकारुन अथवा दुर्लक्षित करून चालणार नाही असा राजकीय विश्लेषकांचा व्होरा आहे.
तिसरी आघाडीचा प्रयोग कुणाला धक्का देणार?
राज्यात मुंबई महापालिका निवडणुकीसह 29 महापालिकांचा बिगुल वाजला आहे. यामध्ये सत्तेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी विविध समीकरणं जुळून येत असल्याचे समोर येत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील बेबनाव समोर आला आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी राज्यात तिसरी आघाडी अस्तित्वात येईल का, असा सवाल करण्यात येत आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबत घरोबा कायम ठेवला तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकटं पाडलं आहे. अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यासोबत हात पुढे केला आहे. घड्याळ्याची काटे फिरली आहेत. तर नवीन आघाडीची तुतारी लवकरच वाजण्याची शक्यता आहे. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसने मुंबईत वेगळा घरोबा केला असला तरी पुण्यात मात्र काँग्रेस या दोन्ही भावांसोबत जाण्याची शक्यता आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरमध्ये कदाचित ही तिसरी आघाडी अनेकांची समीकरणं बिघडवण्याची शक्यता आहे. तर राज्याचे राजकारणही नवीन वळणावर जाण्याची शक्यता आहे.
पुण्यात काँग्रेससोबत ठाकरे ब्रँड
पुण्यात भाजप आणि शिंदे सेनेत जागा वाटपावरून खलबतं सुरु आहेत. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जागा वाटपाचे गणित लवकरच जुळण्याची शक्यता आहे. तर आता पुण्यात दोन्ही ठाकरे बंधुंसोबत काँग्रेसचा पंजा असणार आहे. त्यामुळे पुण्यात तर अनोखे राजकीय समीकरण जुळल्याचे दिसून येते. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत या नवीन समीकरणाचे परिणाम आणि परिमाण दिसतील.
पण हे प्रयोग भविष्यातील राजकीय प्रयोगाची नांदी असल्याचीही चर्चा रंगत आहे. मनसे आणि उद्धव सेनेसोबत जाण्यास काँग्रेसने नकारघंटा दिली असली तरी जागा वाटपात या दोन्ही पक्षांना पुरक भूमिका राष्ट्रीय पक्ष घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या समाधानासाठी हा निर्णय मान्य केल्याचा दावा करण्यात येत आहे. पुण्यासह इतर महापालिकांमध्ये या दोन्ही बंधुंसोबत जाण्याचा काँग्रेसचा निर्णय महत्त्वाचा मानल्या जात आहे.
