Mumbai Local Update : मुंबईत कोसळधार, पावसामुळे रस्ते वाहतुकीचे तीन तेरा, लोकलच्या तिन्ही मार्गांवरील स्थिती काय?
येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघरसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सध्या मुंबई, ठाणे, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघरसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्याने मुंबई लोकलवर याचा परिणाम झाला आहे. तसेच रस्ते वाहतूकही कोलमडली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची भीती आहे. हवामान खात्यानुसार, पुढील ३ तासात मुंबई आणि ठाण्यासह ५ जिल्ह्यांमध्ये ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने गडगडाटी वादळी वारे आणि विजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक आणि पुणे घाट माथ्यावरही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई लोकलचे वेळापत्रक कोलमडले
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस सुरु असल्याने लोकल आणि रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम पाहायला मिळत आहे. मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरु असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली आहे. अतिवृष्टी झाल्यास अंधेरी सबवेसह मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यात पाऊस कोसळत असल्याने मुंबई लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे.
मुंबईतील विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर मेगाब्लॉक असणार आहे. तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यासोबतच पश्चिम रेल्वेवरही दिवसकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे आधीच मुंबई लोकल उशिराने धावत आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकलचा खोळंबा झाला आहे. सध्या गाड्या दोन-चार मिनिटे उशिराने धावत आहेत.
In view of the forecast of heavy rainfall, updates on #MumbaiRains will be provided on hourly basis next 48 hours suburbwise.
Mumbaikars are advised to follow the page & enable notifications for live alerts. Do share with Mumbaikars.
Stay safe, Mumbai.
Regards, Rushikesh Agre
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) September 28, 2025
अति महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये
पालघर जिल्ह्यातील वसई-विरारसह नालासोपाऱ्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून, काही सखल भागांत पाणी साचले आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणा रात्रभर ‘ऑन अलर्ट’ मोडवर आहेत. दुपारी भरतीची वेळ असल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना अति महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. तसेच नागरिकांनी सुरक्षित राहावे, असे आवाहन कल्याण डोंबिवली प्रशासनाने केले आहे.
