शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील महत्वाचे मुद्दे अन् परिणाम; वाचा…
Important Points in Shivsena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालात काही ठळक मुद्दे असू शकतात. हे मुद्दे नेमके कोणते आहेत? कधी होणार आहे ही सुनावणी? कोण अपात्र ठरणार? कोण पात्र ठरणार? पाहा...

विनायक डावरूंग, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 10 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल लागतोय काही वेळातच या प्रकरणाच्या निकालाच्या वाचनाला सुरुवात होईल. दुपारी चार वाजता निकाल येईल. मुंबईतील विधानभवनात असलेल्या सेंट्रल हॉलमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालाचं वाचन करणार आहेत. एकूण 34 याचिकांसंदर्भात 6 टप्प्यात हा निकाल वाचला जाणार आहे.शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. याआधी दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र या निकाल प्रक्रियेतील महत्वाचे मुद्दे कोणते? पाहुयात…
ठळक मुद्दे कोणते?
एकूण 34 याचिकांचे 6 गटात समावेश करून ही सुनावणी पार पडली. त्यानुसार, सहा गटांत निकाल वाचला जाईल. सुमारे 200 पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे 1200 पानांचं निकाल पत्र तयार करण्यात आले आहेत. परिणामी, सहा गटांतील निकालाचा सारांश केवळ वाचला जाईल. याउलट संपूर्ण निकालाची प्रत ही दोन्ही गटांना पाठवली जाईल.
निकालाचे परिणाम काय असतील?
पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा स्पष्ट होतील. अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार हे स्पष्ट होतील. राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष यांच्या कार्यकक्षा स्पष्ट होतील.
ठाकरे गटात हालचाली
निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात जोरदार हालचाली सुरु आहेत. आज सगळ्या वकिलांची झूम कॉल मिटिंग झाली. या बैठकीत आज येणाऱ्या या निकालासंदर्भात विचारमंथन झालं. वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल उपस्थित होते. निकालाआधी वरिष्ठ वकिलांचा मार्गदर्शन घेतलं गेलं. निकाल जर विरोधात गेला तर आजच ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत.
दरम्यान आजच्या या सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून एक वकील उपस्थित राहणार आहेत. अॅड. सनी जैन विधानभवनात ठाकरे गटाकडून उपस्थित असणार आहे. काही वेळापूर्वी याबाबतचा ई-मेल वकिलांना करण्यात आला आहे. आता काहीच वेळात या प्रकरणाचा निकाल येणार आहे.
