पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले अन् मित्राला कायमचं गमावून बसले, मुंबईतील नॅशनल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तीन तरुण मित्र पाण्यात मस्ती करत असताना एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यातील दोन तरुणांना पोहता येत नव्हते.

मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील बोरिवली परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन मित्रांना पाण्यात मस्ती करणे महागात पडले आहे. यातील एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर एकाला वाचवण्यात यश आले आहे. मनोज राज (17) असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील कॉलेजमध्ये शिकणारे तीन तरुण मित्र कॉलेज सुटल्यानंतर नॅशनल पार्कमध्ये फिरण्यासाठी गेले होते. नॅशनल पार्कच्या आतमध्ये गेल्यानंतर तिन्ही मित्र पाणी असलेल्या ठिकाणी गेले. तिथे मजा-मस्ती करत होते. या तिन्ही तरुणांना पोहता येत नव्हते. मात्र तरीही त्यातील दोन तरुण हे पाण्यात उतरले. पाणी किती खोल आहे, याचा अंदाज त्यांना आला नाही.
ही मस्ती करत असताना अचानक दोन मित्र खोल पाण्यात जायला लागले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या तिसऱ्या मित्राला हाक मारली. त्यावेळी त्या मित्राने लगेचच वाचवण्यासाठी धाव घेतली. त्याने दोघांचाही हात पकडला. मात्र यातील एका मित्राला वाचवण्यात त्याला यश आले. तर दुसऱ्याचा मृत्यू झाला.
घटनेमुळे सर्वांनाच धक्का
यावेळी तरुणाचा जीव वाचवणाऱ्याचा पोलिसांना जबाब नोंदवला. पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबानुसार, आम्ही कॉलेजवरून नॅशनल पार्क येथे फिरण्यासाठी गेलो होतो. आम्हाला खल पाण्याची कल्पना नव्हती. आम्हाला पोहता येत नव्हते. तरीही माझे मित्र पाण्यात उतरले. त्या दोन्ही मित्रांना वाचवताना एकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.