मुंबईच्या अंडरग्राउंड मेट्रो-३ मध्ये मोठा तांत्रिक बिघाड, प्रवासी खोळंबले
मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. मुंबईच्या कफ परेड स्थानकाजवळ मेट्रो बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही मेट्रो बंद पडल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील पहिल्या आणि महत्त्वाकांक्षी भुयारी मेट्रो-३ मध्ये आज मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील कफ परेड स्थानकाजवळ भुयारात मेट्रो बंद पडली आहे. ही मेट्रो थांबल्याने प्रवाशांना काही काळ त्रासाला सामोरे जावे लागले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. मात्र मेट्रोच्या वेळेवर परिणाम झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील ॲक्वा लाईन अशी ओळख असलेल्या मुंबई मेट्रो-३ मार्गिकेवरील कफ परेड स्थानकाजवळ आज तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे आज सकाळी १०.३० च्या दरम्यान ही घटना घडली. कफ परेड स्थानकाच्या जवळच मेट्रो थांबल्याने संपूर्ण मार्गिकेवरील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. मेट्रोच्या प्रणालीमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे खबरदारी म्हणून मेट्रो थांबवण्यात आली आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे मेट्रो-३ चे चालवली जाते. मेट्रो कॉर्पोरेशनला या बिघाडाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ दुरुस्ती कार्य सुरू केले. तसेच या मेट्रोतील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात आली. एमएमआरसीएलचे अभियंते आणि तांत्रिक पथकाकडून तात्काळ दुरुस्ती केली जात आहे. या बिघाड झालेल्या मेट्रोची तपासणी करून ती पुन्हा सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही
दरम्यान मेट्रो-३ ही आरे ते कफ परेड या मार्गावर धावते. काही महिन्यांपूर्वी या मेट्रोचे उद्धाटन करण्यात आले होते. या बिघाडामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या अनेक नोकरदार आणि प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एमएमआरसीएलने दिलगिरी व्यक्त केली आहे. या तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधण्यासाठी सविस्तर चौकशी सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
