Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…
नालासोपारा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. तेथे तुळिंज पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तिथे छापा टाकल्यावर जे दिसलं ते पाहून सगळेच हादरले.

नालासोपारा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. तेथे तुळिंज पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तिथे छापा टाकून सुमारे 3 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी एका नायजेरियन महिलेलाही अटक केल्याचे समोर आले आहे. मात्र तिचा एक साथीदार घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
ती टीप मिळताच पोलिसांनी टाकला छापा
नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव परिसरातील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. तेथे एक नायजेरियन महिला अमली पदार्थ विकत असल्याची गुप्त माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली होती. ही टीप मिळताच तुळींज पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाईचा निर्णय घेतला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी त्या बिल्डींगमधील संबंधित ठिकाणावर छापा टाकला. मात्र पोलिसांचं पथक वैष्णवी अपार्टमेंटमध्ये पोहचलं खरं, पण तिथे उपस्थित असलेला त्या महिलेचा साथीदार घटनास्थळावरून लगेच पळून गेला. असं असंल तरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पोलिसांनी त्या नायजेरियन महिलेला ताब्यात घेतले. तिची झडती घेतली असता तिच्याकडे मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ आढळून आला.
3 कोटींचं ड्रग जप्त
या कारवाईत पोलिसांनी तब्बल 1 हजार 620 ग्रॅम एमडी जप्त केलं आहे. या जप्त केलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 3 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. नालासोपारा परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांकडून यापूर्वीही अनेक मोहिमा राबवण्यात आल्या होत्या. काही परदेशी नागरिकांकडून अमली पदार्थांची विक्री आणि पुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर आल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाई केली असली तरी काही जणांकडून गुप्तपणे हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे तपासात दिसून येत आहे.
फरार साथीदाराचा शोध सुरू
या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेची सखोल चौकशी सुरू असून, तिच्याकडून अमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या नेटवर्कची माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. तसेच फरार झालेल्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.
