शरद पवार गटाची राजकीय खेळी, केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलं ‘असं’ उत्तर, अजित पवार अडचणीत येणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाने आता अजित पवार गटाच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर पाठवलं आहे. या उत्तरात शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेलीच नाही, असं म्हटलं आहे.

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून आता महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. पक्षाचे अनेक आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा केला आहे. त्यांच्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला नोटीस पाठवली होती. त्या नोटीसला आता शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आलं आहे. या उत्तरात शरद पवार यांच्या गटाकडून अजित पवार यांच्या गटाला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही, असं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिन्हाबाबतची मागणी ही तथ्यहीन, दुर्भाग्यहीन आहे, असं शरद पवार गटाने म्हटलं आहे. अजित पवार गटाची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली पाहिजे, अशी मागणीही शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या उत्तरात नेमकं काय म्हटलंय?
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही.
- अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाबाबत केलेली मागणी तथ्यहीन आणि दुर्भाग्यपूर्ण आहे.
- निवडणूक आयोगाने अजित पवारांची मागणी फेटाळली पाहिजे.
- अजित पवारांच्या याचिकेमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत हे सिद्ध होत नाही.
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडणूक आयोगात नोंदणीकृत पक्ष आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि अध्यक्षपदाचं पत्र स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणूक आयोगाने जे आम्हाला पत्र पाठवलं आहे, त्या अनुषंगाने आम्ही उत्तर दिलेलं आहे. उत्तर देत असताना आम्ही स्पष्टपणे सांगतिलं आहे की, अशी काही फूट पडलेलीच नाही. पक्षच आमचा आहे. या पक्षावर दुसरा कुणी दावा करु शकत नाही”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.
