शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर सर्व योजनांचा लाभ : कृषीमंत्री दादाजी भुसे

येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर सर्व योजनांचा लाभ : कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई : येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे (One application for all Scheme for Farmer). “महाडीबीटी पोर्टल”च्या माध्यमातून या योजनांची प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी प्रत्येकवेळी स्वतंत्र अर्ज द्यावा लागणार नाही. अर्जावरील कार्यवाहीचे एसएमएस देखील लाभार्थ्याला पाठवले जातील. यामुळे शेतकऱ्याला कृषी विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. सर्वच टप्प्यांवर मानवी हस्तक्षेप कमी होणार असल्याने योजनांमध्ये पारदर्शकता येईल, असं मत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केलं.

योजनेसाठी मोबाईल ॲप

“महाडीबीटी पोर्टल” आणि “महाभूलेख” संकेतस्थळाची जोडणी करण्याचं कामही प्रगतिपथावर आहे. ते पूर्ण होताच शेतकऱ्यांना अर्जासोबत “सातबारा” आणि 8अ ही कागदपत्रं द्यावी लागणार नाही. या योजनेचं मोबाईल ॲप देखील विकसित करावं, अशी सूचना कृषीमंत्री भुसे यांनी संबंधित विभागाला दिली आहे.

कृषीमंत्र्यांनी विदर्भाच्या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत अकोला, अमरावती, नागपूर येथे आढावा बैठका घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देणारा राज्यातला पहिला विभाग कृषी ठरला आहे. त्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना त्याद्वारे लाभ घेता आला पाहिजे, अशा सूचना कृषीमंत्र्यांनी दिल्या आहेत.

दरवर्षी नव्याने अर्जाची गरज नाही

आतापर्यंत शेतकऱ्याला दरवर्षी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकवेळी स्वतंत्र अर्ज करावा लागतो. आता मात्र योजना कोणतीही असेना शेतकऱ्याला फक्त एकदाच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज छाननी, निवड, लाभार्थ्याला पात्र-अपात्र ठरवणं, पूर्वसंमती, मंजुरी आदेश, अनुदानाचा लाभ देणे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन प्रणाली मार्फत केली जाणार आहे. एखाद्या योजनेच्या लाभासाठी हजारो अर्ज येतात. त्या योजनेची लक्षांक पूर्ती झाली की उर्वरित शेतकऱ्यांना त्यातून लाभ मिळत नाही. अशावेळी शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी नव्याने अर्ज करावा लागतो.

आता एकदा अर्ज केला की परत अर्जाची गरज नाही. ही प्रणाली एखाद्या शेतकऱ्याला विशिष्ट योजनेतून त्याच्या मागणीनुसार लाभ देता येत नसेल तर अन्य दुसऱ्या कुठल्या योजनेतून देण्याची कार्यवाही करेल आणि लाभ दिला जाईल. एखाद्या वर्षी शेतकऱ्याची निवड झाली नाही तर त्याचा अर्ज बाद न होता पुढच्या वर्षासाठी तो ग्राह्य धरला जाईल. या प्रणालीद्वारे राज्यात एकाच वेळी लॉटरी पद्धतीने तालुकानिहाय लाभार्थ्यांची निवड होणार आहे. ऑनलाईन कार्यपद्धतीमुळे अधिक गतीने शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असंही भुसे यांनी सांगितले.

अर्जावरील कार्यवाहीची माहिती एसएमएसद्वारे

विशेष म्हणजे या नव्या प्रणालीत शेतकऱ्याला प्रत्येक टप्प्यावर त्याच्या अर्जावरील कार्यवाहीची माहिती एसएमएसद्वारे कळविली जाईल. अर्ज करताना शेतकऱ्याला कागदपत्रे सादर करावी लागणार नाही. योजनेसाठी त्याची निवड झाल्यावर त्याच्याकडून कागदपत्रे घेतली जातील, असे विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

One application for all Scheme for Farmer

Published On - 9:10 pm, Sun, 9 February 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI