मुंबई-दिल्ली फिरलेल्या फिलिपिन्सच्या ‘त्या’ नागरिकाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू नाही

मुंबई-दिल्ली फिरलेल्या फिलिपिन्सच्या 'त्या' नागरिकाचा 'कोरोना'मुळे मृत्यू नाही

मधुमेह व अस्थमा या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत फिलिपिन्सच्या नागरिकाचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. (Philippines Citizen Corona Negative)

अनिश बेंद्रे

|

Mar 24, 2020 | 4:24 PM

मुंबई : महाराष्ट्रातील तीनच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. फिलिपिन्सच्या नागरिकाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. फिलिपिन्सच्या 68 वर्षीय नागरिकाचा काल (सोमवार 23 मार्च) मुंबईत मृत्यू झाला होता. (Philippines Citizen Corona Negative)

मृत्यू झालेल्या फिलिपिन्सच्या संबंधित नागरिकाने मुंबई, नवी मुंबई आणि दिल्ली अशा तीन महत्त्वाच्या शहरात प्रवास आणि धार्मिक स्थळांवर वास्तव्यही केलं होतं. हा सर्व धक्कादायक प्रकार मुंबई महापालिकेच्या सतर्कतेमुळे समोर आला होता. त्यामुळे सर्वत्र धाकधूक वाढली होती.

हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णाचा कोरोना हा आजार बरा झाला होता. त्याला असलेल्या मधुमेह व अस्थमा या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण उपचाराअंती बरे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. 106 रुग्णांपैकी केवळ दोघांची स्थिती गंभीर आहे, तर 15 जणांना डिस्चार्ज मिळू शकतो, अशी गुड न्यूज राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद टाळत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.

फिलिपिन्स ते दिल्ली व्हाया मुंबई

दुबईतून आलेल्या प्रवाशांनी महाराष्ट्रात ‘कोरोना’ आणल्याचं समोर आलं होतं. पण, कोरोनाने फिलिपिन्स मार्गेही भारतात प्रवेश केल्याची भीती व्यक्त केली जात होती. एका धार्मिक कार्यक्रमासाठी फिलिपिन्समधून 68 वर्षीय व्यक्ती एकूण 10 जणांच्या गटासह भारतात आला होता. तो सर्वात अगोदर मुंबईत आला. त्यानंतर तो नवी मुंबईत गेला आणि धार्मिक कार्यक्रमासाठी दिल्लीला गेला. विशेष म्हणजे त्यानंतर तो दिल्लीतून पुन्हा मुंबईत आला आणि नवी मुंबईतील वाशी येथे गेला.

वाशीमध्ये रुग्णाची प्रकृती खालावली आणि त्याला तिथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्याला उपचारासाठी थेट कस्तुरबा रुग्णालयात हलवलं. कस्तुरबा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर रुग्णाला ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं, त्यातील दोघांनाही ‘कोरोना’ची लागण झाल्याचं उघड झालं.

धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या या फिलिपिन्सच्या नागरिकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणं आणि त्यांच्या चाचण्या करण्याचं नवं आव्हान यंत्रणेसमोर उभं ठाकलं होतं. कोरोनाचा धोका टाळणं ही केवळ सरकार आणि महापालिकांचीच जबाबदारी नाही. तर खासगी संस्था आणि असे कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनीदेखील काळजी घेण्याची गरज आहे. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह येणं हि दिलासादायक बाब आहे.

(Philippines Citizen Corona Negative)

फिलिपिन्सच्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक प्रवास

 • 3 मार्च – फिलिपिन्समधून या बाधितासह एकूण 10 जणांचा गट मुंबईत आला. या सर्वांची राहण्याची व्यवस्था वाशीतील नूर मशिदीत करण्यात आली.
 • 5 मार्च – फिलिपिन्समधून आलेला हा गट वाशीतून मुंबई सेंट्रल स्थानक आणि तिथून रेल्वेमार्गे दिल्लीला गेला.
 • 6 मार्च – दिल्लीतील एका मशिदीत त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली
 • 7 ते 9 मार्च – दिल्लीतील मशिदीत धार्मिक कार्यक्रमात हा गट सहभागी झाला
 • 10 मार्च – रेल्वे मार्गे हा गट दिल्लीतून मुंबईला परतला आणि पुन्हा वाशीच्या मशिदीत मुक्कामाला पोहोचला
 • 10 मार्च – या 10 जणांच्या गटातील 68 वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत असल्यानं डॉक्टरकडे नेण्यात आलं, तपासणीनंतर डॉक्टरांना त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवले
 • 12 मार्च – तपासणी अहवालात या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं
 • 13 मार्च – वाशी आणि दिल्लीतील या गटानं वास्तव्य केलेल्या मशिदी 14 दिवसांसाठी बंद करण्यात आल्या
 • 14 मार्च – या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं
 • 17 मार्च – 68 वर्षीय फिलिपिन्सच्या नागरिकाची प्रकृती खालावली, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं
 • 23 मार्च – फिलिपिन्सच्या नागरिकाचा मृत्यू झाला

Philippines Citizen Corona Negative

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें