8 दिवस गूढ, मासं खाताना अडकले अन्… राणीबागेतील शक्ती वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे? माहिती समोर
मुंबईच्या राणीबागेतील शक्ती वाघाचा 17 नोव्हेंबर 2025 रोजी मृत्यू झाला, मात्र प्रशासनाने ही बातमी आठ दिवस दडवून ठेवली. यामुळे हलगर्जीपणाचा संशय बळावला आहे. मृत्यूचे कारण आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत.

मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) शक्ती नावाच्या वाघाचा 17 नोव्हेंबर 2025 रोजी मृत्यू झाला. मात्र प्रशासनाने या वाघाच्या मृत्यूची बातमी आठ दिवस लपवून ठेवल्यामुळे तीव्र संशय व्यक्त होत आहे. या वाघाच्या मृत्यूचे कारण आणि प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. आता याप्रकरणी राणीबाग प्रशासनाचे स्पष्टीकरण समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
उद्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राणीबागेत शक्ती वाघाचा मृत्यू 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12:15 च्या सुमारास झाला. वाघाला अचानक अपस्माराचे झटके आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. वाघाचा मृत्यू 17 नोव्हेंबरला झाला असताना ही माहिती 24 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच आठ दिवस प्रसिद्ध करण्यात आली नाही. या विलंबामुळेच त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटलं जात आहे. प्रशासनाने दावा केला की मृत्यूची माहिती 18 नोव्हेंबर रोजी ईमेलद्वारे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (CZA) आणि महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांना कळवण्यात आली होती.
वाघाच्या मृत्यूचे कारण काय?
प्राथमिक माहितीनुसार, शक्ती वाघाची फुफ्फुसे 90 टक्के खराब झाली होती. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ येथील पॅथोलॉजी विभागाने प्राथमिक मृत्यूचे कारण ‘Payogranulomatous Pneumonia Resulting in Respiratory Failure’ (श्वसन निकामी होण्यास कारणीभूत असलेला पायोग्रॅन्युलोमॅटस न्यूमोनिया) असे दिले आहे. अंतिम अहवाल आणि नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राकडील अवयवांचे नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
व्याघ्रप्रेमी प्रथमेश जगताप आणि आमदार अजय चौधरी यांनी ‘शक्ती’चा मृत्यू श्वसन नलिकेजवळ हाड अडकल्यामुळे झाला असावा, अशी शक्यता वर्तवली आहे. मांस खाताना हाड अडकले आणि उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाला, असे म्हटलं जात आहे. आमदार अजय चौधरी यांनी आयुक्तांची परवानगी न मिळाल्याने माहिती दडवली गेली असावी, असा संशय व्यक्त केला आहे.
दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा
प्रथमेश जगताप यांनी प्राणी संग्रहालय प्रशासन आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे शक्तीचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप केला आहे. उपचाराअभावी वाघाचा मृत्यू होतो, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हा शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वीच आणि माहिती जाहीर न करताच वाघाच्या मृतदेहाची घाईघाईत विल्हेवाट का लावली गेली, असा सवालही विचारला जात आहे. अजय चौधरी यांनी शवविच्छेदन इन कॅमेरा’ (In Camera) झाले का, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी राज्याचे वनमंत्री आणि महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी व्याघ्रप्रेमींनी केली आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमावी, अशी मागणी अजय चौधरी यांनी केली आहे.
शक्ती वाघ हा फेब्रुवारी 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील प्राणिसंग्रहालयातून आणला गेला होता. त्यावेळी तो अंदाजे साडेतीन वर्षांचा होता. तो राणीबागेतील ‘जय’ आणि वाघीण ‘करिश्मा’ यांच्यासोबत राहत होता. या जोडीला जय व रुद्र अशी पिल्ले झाली होती. वाघ गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे तंदुरुस्त आणि निरोगी होता, असा दावा केला आहे. राणीच्या बागेतील वाघाच्या मृत्यूमुळे प्राणीप्रेमींना धक्का बसला आहे. या मृत्यूच्या सखोल चौकशीतून सत्य कधी बाहेर येणार आणि दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
