Sanjay Raut: ‘फक्त जयश्रीराम म्हणा, सिलेंडर तुमच्या दारात’, संजय राऊतांचा जहरी टोला, तर नमो नमो म्हटल्यास…

Sanjay Raut Harsh Comments: LPG सिलेंडर तुटवडा आणि टंचाईवर उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी जहरी टोला हाणला आहे. त्यांनी देशात सामान्य नागरीक गॅस दरवाढ आणि तुटवड्याने हैराण झालेला असताना सरकारच्या धोरणाचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी पंतप्रधानांच्या त्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.

Sanjay Raut: फक्त जयश्रीराम म्हणा, सिलेंडर तुमच्या दारात, संजय राऊतांचा जहरी टोला, तर नमो नमो म्हटल्यास...
संजय राऊतांचा मोठा टोला
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 12, 2026 | 11:08 AM

Sanjay Raut on PM Narendra Modi: आखाती देशातील युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा आणि टंचाई आहे. हॉटेल व्यावसायिकच नाही तर सर्वसामान्य नागरिकही मेटाकुटीला आला आहे. अनेक एजन्सींबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. या सर्व परिस्थितीबाबत उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर आसूड ओढला आहे. त्यांनी सरकारच्या धोरणाचा समाचार घेतला आहे. तर पंतप्रधान अशी बिकट परिस्थिती असताना केरळ आणि तामिळनाडूत प्रचारात कसे मशगूल राहू शकतात असा सवाल त्यांनी केला.

‘फक्त जयश्रीराम म्हणा, सिलेंडर तुमच्या दारात’

देशातील गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याप्रकरणी त्यांना सवाल केला असता राऊतांनी जोरदार टोला हाणला. फक्त जय श्रीराम सिलेंडर म्हणा, घरपोच सिलेंडर मिळणार. नमो नमो हा मंत्र जपल्यास पेट्रोल आणि डिझेलही दारात येणार असा चिमटा त्यांनी काढला. आपल्या देशात अंधभक्ती पराकोटीला गेल्याचे ते म्हणाले. देशात गॅस टंचाईचे संकट असताना भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर क्राईसीस कोणता आहे तर केरळ, तामिळनाडूमध्ये, आसाममध्ये निवडणुका जिंकणं हा त्यांच्यासमोरील अजेंडा आहे, अशी टीका त्यांनी केली.

नमो नमो नमो हा एक मंत्र आहे. हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला पेट्रोल-डिझेल घरपोच मिळेल. तुमच्या दारात ही मंडळी पाईप घेऊन येतील. नमो नमो नमो म्हणा आणि जय श्रीराम म्हणा, सर्व काही मिळेल इतक्या स्तरावर या देशात अंधभक्ती वाढली आहे. यामुळे या देशातील प्रमुख प्रश्नाची चिंता कुणालाच वाटत नाही, असे वक्तव्य राऊतांनी केले.

पंतप्रधानांवर राऊतांची टीका

इराण-इस्त्रायल युद्धाबाबत अनेक देशांनी प्रतिक्रिया व्यक्त केली पण भारताने त्याबाबत काही मत केलं नाही असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. त्यावर देशाचे पंतप्रधान सध्या कुठं आहेत असा प्रति सवाल करत राऊतांनी मोठी टीका केली. पंतप्रधान हे केरळमध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहेत. देशातील जनतेसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गॅस, पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलाचं संकट आले आहे. पण त्याच्यावरती पंतप्रधानांकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही, कोणतंही साधं वक्तव्य आलेलं नाही. ते केवळ निवडणुका जिंकण्यासाठी आणि त्यासाठी सरकारी तिजोरीचा अमाप खर्च करत आहेत. देशाचं दुर्देव आहे की अशा प्रकारचे संवेदनशील शून्य पंतप्रधान लाभले अशी मोठी टीका त्यांनी केली.

या देशाला परराष्ट्र धोरण नाही. नरेंद्र मोदींना जगात कोणताही मान आणि प्रतिष्ठा राहिली नाही. एकेकाळी जागतिक राजकारणात या देशाला, भारताला फार महत्त्व होते. की भारताचे धोरण काय आहे. भूमिका काय आहे, याची विचारणा व्हायची. पण आता ती बाजू राहिली नाही. युद्धाच्या आधी एक दिवस मोदी हे इस्त्रायलच्या दौऱ्यावर जातात. त्यानंतर इराणच्या सुप्रीम नेत्याची हत्या केली जाते. त्याचा शोक सुद्धा या देशाचे पंतप्रधान व्यक्त करत नाहीत. याचा अर्थ तुम्ही कुणाच्या तरी दबावाखाली आहात. कुणीतरी तुम्हाला ब्लॅकमेल करत आहे अशी टीका संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

Follow Us