काड्या करणं थांबवा नाहीतर जनता बांबू घालेल, संजय राऊत यांना कशाचा आला राग?; संतप्त इशारा कुणाला?
टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांना झालेली अटक चुकीची आहे. हे निषेधार्थ आहे. ही राजकीय अटक आहे. निवडणुका जवळ आल्याने हा प्रकार सुरू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

मुंबई | 10 सप्टेंबर 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावात सभा होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दोन्ही पुतळ्याचं अनावरण करण्यास शासनाने विरोध केला आहे. प्रोटोकॉलनुसार या दोन्ही पुतळ्यांचं अनावरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं पाहिजे, असं पत्रकच राज्य शासनाचे उपसचिव शंकर जाधव यांनी जळगावच्या पालिका आयुक्तांना पाठवलं आहे. त्यामुळे अनावरण सोहळ्याचा वाद निर्माण झाला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट सरकारलाच सवाल केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी पुतळा अनावरणावरून सरकारला धारेवर धारलं आहे. जे परिपत्रक आहे ते त्यांच्याकडे ठेवावे. मुळात सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. त्या जळगाव महानगरपालिकेचा हा कार्यक्रम आहे. महानगरपालिका ही एक स्वायत्त संस्था आहे आणि त्या पुतळ्याच्या जागेचं भूमिपूजन उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. तेव्हा का नाही त्यांना बुद्धी सुचली? तेव्हा का नाही भूमिपूजन केलं? हा पुतळा आम्ही बसवणार? तेव्हा का नाही आले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री? तेव्हाच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं पुतळ्याच्या उद्घाटना मी येणार. यात काय चुकलं आहे?; असा सवाल संजय राऊत यांनी केला.
नाही तर पेन्शन देऊ
आम्हाला महानगरपालिका आणि महापौरांचेआमंत्रण आहे. त्यामुळे आम्ही अनावरण सोहळ्याला जाणारच आहोत. वल्लभभाई पटेल यांचा पुतळा असेल मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल आता हे जे काड्या घालण्याचे काम करत आहे. ते थांबवा नाहीतर जनता तुम्हाला बांबू घालेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. आज तुम्ही कुठे राजकारण करत आहात? हे बंद करा धंदे तुमचे. थोडे दिवस राहिले आहे ते तुम्ही सुखाने जगा मग तुम्हाला पेन्शनित जायचं आहे. आम्ही तुम्हाला पेन्शन देऊ, असा हल्लाही त्यांनी चढवला.
म्हणून वेळ लागतोय
यावेळी त्यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दयावरूनही टीका केली. आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करण्याचं काम 40 तासांचं आहे. त्यात काय मोठं आहे. इथे प्रत्येकाने बेईमानी केली आहे. एका पक्षातून निवडून आले आणि दुसऱ्या पक्षात गेले. अशा फुटीला संविधानात मान्यता नाही. फुटीरांकडे कोणतंही सबळ कारणण नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनीही अधिक वेळ घेऊ नये. इथे विधानसभा अध्यक्ष फुटलेले आहेत. म्हणून त्यांना इतका वेळ लागत आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.
