शिवसेनेचे दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी घंटानाद आंदोलन, कल्याणमध्ये तणावाचे वातावरण
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी दोन्ही शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येते. बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना दुर्गाडी किल्ल्यावर प्रार्थना करण्यास बंदी असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने घंटानाद आंदोलन केले. शनिवारी झालेल्या या आंदोलनामुळे कल्याणमध्ये तणाव आहे.

कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसेनेकडून शनिवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. हिंदू-मुस्लीम धर्माची प्रार्थनास्थळे दुर्गाडी किल्ल्यावर आहे. परंतु बकरी ईदनिमित्त हिंदू समुदायास किल्ल्यावर प्रार्थना करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे त्याविरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी लाल चौकीजवळ मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कल्याणमध्ये परिस्थिती तणावाची असली तरी नियंत्रणात आहे. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या आमदार विश्वनाथ भोईर, आमदार राजेश मोरेसह शेकडो पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
१९७२ पासून आंदोलन
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी दोन्ही शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येते. बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना दुर्गाडी किल्ल्यावर प्रार्थना करण्यास बंदी असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने घंटानाद आंदोलन करण्यात येते. शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना १९७२ सालापासून या आंदोलनास सुरुवात झाली होती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली याची सुरुवात झाली होती. या किल्ल्यावर मुस्लीम आणि हिंदूंची प्रार्थनास्थळ आहे.
दोन्ही शिवसेनेकडून आंदोलन
बकरी ईदला मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने या किल्ल्यावर येतात. या ठिकाणी नमाज अदा करतात. यामुळे हिंदूंना जाण्यास बंदी घातली गेली आहे. त्या निर्णयास विरोध करत किल्ल्यावर जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक पोहचले. परंतु लाल चौकी परिसरात पोलीस बॅरिकेड्स लावून आंदोलनकर्त्यांना थांबवले आहे. शिवसैनिक बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु पोलिसांनी त्यांना रोखून धरले आहे. या ठिकाणी शिवसैनिक घोषणा देत आहे. देवीची आरती शिवसैनिकांकडून या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकसुद्धा या ठिकाणी आंदोलन करणार आहे.
शिवसेना फूटल्यानंतर दोन्ही गट दरवर्षी मोठ्या प्रमाणात दुर्गाडी किल्ल्याजवळ एकत्र येऊन मंदिरात पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुस्लिम बांधव या दिवशी नमाज अदा करत असल्याने संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून रस्ते बंद करून आंदोलनकर्त्यांना लाल चौकीजवळच अडवले जाते. आज बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेचे पथक सज्ज आहे.
आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले, जोपर्यंत मंदिर सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. पोलीस एका धर्माला नाही तर दुसरा धर्मावर अन्याय करतात. आम्ही सत्तेत असलो तरी आंदोलन करणार आहे. नमाज सुरू असताना मंदिर खुलच ठेवण्यात यावे, अशी मागणी भोईर यांनी केली.
