बॉलिवूडमध्ये सर्व व्यवहार स्वच्छ, पारदर्शक; अपवाद फक्त अनुराग, तापसीचा?, सामना अग्रलेखात केंद्राला फटकारे

हिंदी सिनेसृष्टीतले इतर सर्व व्यवहार, उलाढाली स्वच्छ आणि पारदर्शक आहेत, अपवाद फक्त तापसी आणि अनुराग कश्यप यांचा? असा सवाल सामना अग्रलेखात करण्यात आला आहे. (samana editorial taapsee pannu anurag kashyap)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 6:51 AM, 5 Mar 2021
बॉलिवूडमध्ये सर्व व्यवहार स्वच्छ, पारदर्शक; अपवाद फक्त अनुराग, तापसीचा?, सामना अग्रलेखात केंद्राला फटकारे
अनुराग कश्यप, सामना दैनिक आणि तापसी पन्नू

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) यांच्याची निगडित असलेल्या जवळपास 30 ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. आयकर विभागाच्या कारवाईवर अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले गेले. याच मुद्द्यावरुन शिवसेनेने(Shivsena) सामना अग्रलेखाच्या माध्यमातून सरकारला घेरले आहे. “केंद्र सरकारविरुद्ध टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले असतानाच मोदी सरकारविरुद्ध परखड बोलणाऱ्या कलाकार, सिनेसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शकांवर ‘इन्कम टॅक्स’ने धाडी घालायला सुरुवात केली आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल, सिने वितरक मधू मँटेना हे त्यात प्रमुख आहेत. मुंबई-पुण्यात 30 पेक्षा जास्त ठिकाणी धाडी घातल्या. तापसी पन्नू, अनुराग कश्यप हे त्यांची मते परखडपणे मांडत असतात. एक प्रश्न यामुळे असा निर्माण होतो की, हिंदी सिनेसृष्टीतले इतर सर्व व्यवहार, उलाढाली स्वच्छ आणि पारदर्शक आहेत, अपवाद फक्त तापसी आणि अनुराग कश्यप यांचा?,” सामनाने आपल्या अग्रलेखात म्हटलंय. तसेच, देशातील राजकीय चित्र अधिकाधिक स्पष्ट होत आहे की, अधिकाधिक गोंधळाचे आणि गुंतागुंतीचे होत आहे? असा सवालही आजच्या अग्रलेखात करण्यात आलाय.  (shiv sena criticizes central government in its samana newspaper editorial on income tax department raid on taapsee pannu and anurag kashyap offices)

शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्याची किंमत मोजावी लागली

यावेळी, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळेच अनुराग आणि तापसी यांना ही किंमत मोजावी लागत असल्याचा आरोप सामनात करण्यात आलाय. सामनाने म्हटलंय, की “सिनेसृष्टीतल्या अनेक महान उत्सवमूर्तींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात विचित्र भूमिका घेतली. त्यांनी शेतकऱयांना पाठिंबा तर दिला नाहीच, उलट जगभरातून जे लोक शेतकऱयांना पाठिंबा देत होते त्यांचा पाठिंबा म्हणजे आपल्या देशात ढवळाढवळ असल्याचे मत या उत्सवमूर्तींनी व्यक्त केले. पण तापसी, अनुराग कश्यपसारखी मोजकी मंडळी शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभी राहिली. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे,”

बॉलीवूडमधील कोटीच्या कोटी उड्डाणे गंगाजलाच्या प्रवाहातून वर येतात?

तापसी आणि अनुराग यांच्या घरावर धाड टाकल्यानंतर अनेक जाणांनी ही कारवाई सूडबुद्धीने केली जात असल्याचं म्हटलं. हाच मुद्दा घेऊन शिवसेनेने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून केंद्र सरकारला लक्ष्य केलं. “धाडी घालण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी फक्त याच लोकांची का निवड केली? तुमच्या त्या ‘बॉलीवूड’मध्ये जी कोटीच्या कोटी उड्डाणे रोज होत असतात ते काय गंगाजलाच्या प्रवाहातून वर येतात? पण व्यवहारात कोठे तरी पाणी मुरतच असल्याने सरकारच्या तालावर नाचायचे व बोलायचे हेच आतापर्यंत घडत आले. त्यातले काही लोक मात्र स्वाभिमानी किंवा वेगळय़ा धाटणीचे असतात. मुळात ‘बॉलीवूड’ लॉक डाऊन काळात प्रचंड अडचणीत आहे. चित्रीकरण, नव्या निर्मिती बंद आहेत. सिनेमागृहे बंद आहेत. एक मोठा उद्योग व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असताना त्यावर राजकीय सूडबुद्धीने असे हल्ले करणे योग्य नाही. मोदी सरकारची उघड चमचेगिरी करणारे कित्येकजण सिनेसृष्टीत आहेत. त्यातले अनेकजण तर मोदी सरकारचे सरळ लाभार्थीच आहेत. त्या सगळय़ांचे व्यवहार आणि उलाढाली धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहेत काय?,” असं समाना अग्रलेखात म्हटंलय. तसेच, भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केल्यामुळे कारवाई होत असल्याचे आरोप माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी फेटाळले आहेत. तपास यंत्रणांकडे जी खात्रीशीर माहिती येते त्याआधारे कारवाई केली जाते, अशी ‘दिव्य’ माहिती श्री. जावडेकरांनी दिली आहे. म्हणजे बॉलीवूडमधील भलेबुरे धंदे जणू समस्त देशवासीयांना माहीतच नव्हते असे कंद्रीय मंत्र्यांना म्हणायचे आहे काय?, असा सवालही पुढे समना अग्रलेखात करण्यात आलाय.

सर्वांना सत्ताधाऱ्यांच्या पालखीचे भोई होता येत नाही

यावेळी शिवसेनेने आपल्या अग्रलेखात दीपिका पादूकोन, पर्यावरण कार्यकर्ती दिशी रवी यांच्याविरोधात राबवलेल्या मोहिमांवरही भाष्य केलं आहे.”काहीजण पाठीला कणा आहे हे वेळप्रसंगी दाखवत असतात व पडद्यावर ज्या संघर्षमय भूमिका करतात त्याप्रमाणे प्रत्यक्ष जीवनात जगण्याचा प्रयत्न करतात. ‘पिंक’, ‘थप्पड’, ‘बदला’ अशा चित्रपटांत तापसीने केलेल्या भूमिका ज्यांनी पाहिल्या त्यांना तापसी इतकी बाणेदार का? असे कोडे पडणार नाही. अनुराग कश्यपच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल. त्यांचे विचार कदाचित पटत नसतील, पण त्यांना त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहेच. दीपिका पदुकोणने ‘जेएनयू’मध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांची भेट घेताच तिच्याबाबतीतही छुपे आंदोलन, बहिष्काराचे हत्यार चालविण्यात आले. दीपिकाचे चित्रपट ठरवून पाडण्याचे प्रयोग झालेच, पण समाजमाध्यमांवर तिच्याविरुद्ध घाणेरड्या मोहिमादेखील राबविण्यात आल्या. हे सर्व करणारे कोण आहेत किंवा कोणत्या विचारप्रवाहाचे आहेत ते सोडून द्या, पण अशा कृतीतून ते देशाची प्रतिष्ठा नक्कीच वाढवत नाहीत. पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला ज्या घृणास्पद पद्धतीने अटक केली त्यावर जगभरात मोदी सरकारवर टीका झाली. यात देशाचीच बेइज्जती होत असते. गोमांस प्रकरणात झुंड-बळी गेले, पण भाजपशासित राज्यांत गोमांस विक्री जोरात सुरूच आहे. यावर कोणीच कसे बोलायचे नाही?,” असं समनात म्हटंल आहे. तसेच, आपल्या अग्रलेखात सर्वच प्रकारच्या स्वातंत्र्याचे हवन सध्या देशात होत असल्याचे म्हणत “केंद्रीय तपास यंत्रणांचे निःपक्ष काम करण्याचे स्वातंत्र्यही जळून गेले आहे. तापसी, अनुराग कश्यपप्रकरणी तेच घडले आहे,” असा दावा सामनाने केलाय.

इतर बातम्या:

देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणाऱ्याला एका दिवसात बेड्या!, उपमुख्यमंत्री अजिदादांनी शब्द पाळला

Video : ‘श्रीराम बोले मैं कहाँ बडा, मैं तो बीजेपी के मेनिफेस्टो मे पडा’, महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्याकडून व्हिडीओ ट्विट, भाजप भिडणार?

पंतप्रधान मोदींचा आणखी एक मोठा सन्मान, ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरमेंट लीडरशिप अवॉर्डने गौरविण्यात येणार