मुख्यमंत्र्यांसोबत तासभर चर्चा, पण आतली चर्चा बाहेर का सांगू?; संजय राऊतांचा सवाल

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील सांगण्यास संजय राऊत यांनी नकार दिला. (shiv sena leader sanjay raut meets cm uddhav thackeray)

मुख्यमंत्र्यांसोबत तासभर चर्चा, पण आतली चर्चा बाहेर का सांगू?; संजय राऊतांचा सवाल
sanjay raut

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील सांगण्यास संजय राऊत यांनी नकार दिला. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. पण ही आतली चर्चा आतमध्ये. बाहेर का सांगू?, असा सवाल करत संजय राऊत यांनी त्यावर अधिक बोलण्यास नकार दिला. (shiv sena leader sanjay raut meets cm uddhav thackeray)

संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. गणेशोत्सव सुरू आहे. उद्या विसर्जन होणार आहे. त्यामुळे गणपतीचं दर्शन घेतलं. थोड्यावेळ गप्पा मारल्या. गणपती सुद्धा राजकारण्यांचा गुरू आहे. राजकारण्यांनी गणपतीकडून अनेक गोष्टी शिकव्यात. मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली, काय बोललो… या चर्चा आतमध्ये. त्या बाहेर कशाला सांगायच्या?, असं राऊत म्हणाले.

कमालीची शांतता आहे, कोणतंही वादळ नाही

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानाचे तीन पक्षात पडसाद उमटले आहेत का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर पडसाद वगैरे काही नाही. सर्व काही शांत आहे. अलबेल आहे. कोणतंही वादळ नाही. कमालीची शांतता आहे. त्या विधानाने कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर फुटू द्या. पण हे सरकार तीन वर्ष चालणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री माझे मित्रंही

उद्धव ठाकरे हे नुसतेच मुख्यमंत्री नाहीत. ते आमचे पक्षप्रमुख आहेत. तसेच ते माझे व्यक्तिगत मित्रंही आहेत. त्यामुळे आमच्यात गप्पा झाल्या. पक्षाच्या संदर्भातही चर्चा झाल्या. त्यांना वेळ असेल तेव्हा मी जाऊन भेटतो त्यांना आणि त्यांच्याशी चर्चा करत असतो, असंही त्यांनी सांगितलं.

आम्ही 25 वर्ष एकत्रं काम करणार

काळच काय ते ठरवेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. त्यावर काही पडसाद उमटले का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना कोणतेही पडसाद उमटलेले नसल्याचं सांगितलं. आम्ही 25 वर्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत राहणार आहोत. काळाच्या पोटात हेच दडलं आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांशी माझा चांगला संबंध आहे. त्यांच्याशी नेहमी बोलणं होतं. त्यामुळे सर्वकाही अलबेल आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ते विधान मुद्दाम केलं

मुख्यमंत्र्यांनी ते विधान अचानक केलेलं नाही. ते जाणीवपूर्वक केलेलं विधान आहे. जे माजी आहेत, त्यांनी भावी व्हावं म्हणून त्यांनी ते विधान केलं आहे. काही लोकं महाविकास आघाडीशी संपर्क ठेवत आहेत. अनेक लोक येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणाले. ते रावसाहेब दानवेंना म्हणाले नाहीत. दानवे हे केंद्रातील नेते आहेत. मुख्यमंत्र्यांचं विधान राज्यातील नेत्यांबाबत होतं, असंही ते म्हणाले.

मोदींशी चांगले संबंध

चंद्रकांतदादांनी दोन दिवसांची मुदत दिली होती. ती संपली आहे. दोन दिवसात काही तरी होईल असं ते म्हणाले. होते. मला वाटतं त्यांना एक्सटेंन्शन द्यावं लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला. तर मोदी आणि ठाकरे कुटुंबांचे संबंध फार जुने आहेत. चांगले संबंध आहेत. व्यक्तिगत संबंध तसेच राहतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न

पंजाबमध्ये काही होत असेल तर काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्याच्या बेडरूममध्ये पाहण्याची गरज नाही. त्यासाठी एका राष्ट्रीय पार्टीची नियुक्ती केली आहे. ते लोक हेच काम करत असतात, असा चिमटाही त्यांनी काढला. (shiv sena leader sanjay raut meets cm uddhav thackeray)

 

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज? खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?; राऊतांचा सवाल

कोणीही कायमचा शत्रू नाही, कोणीही मित्र नाही; राजकारणात चमत्कार होऊ शकतो; राधाकृष्ण विखे-पाटील यांचं सूचक विधान

(shiv sena leader sanjay raut meets cm uddhav thackeray)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI